विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना पाच लाखांचे अनुदान खा. संदिपान भुमरे यांची वैजापूर येथे घोषणा !

यापुढे विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना पाच लाखांचे अनुदान
खा. संदिपान भुमरे यांची वैजापूर येथे घोषणा !
वैजापूर :(NZI वृत्तसेवा) – रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात
येणाऱ्या वैयक्तिक विहिरीच्या अनुदानात आता एक लाख रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. यापुढील काळात योजनेंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या शेतात विहीर खोदण्यासाठी जवळपास पाच लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात येईल. या निर्णयावर येत्या एक ते दोन दिवसांत शिक्कामोर्तब करणार आहे, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री व नवनिर्वाचित खा, संदीपान भुमरे यांनी शनिवारी (दि.२२) वैजापूर येथे केली.
वैजापूर येथे खा. भुमरे यांचा जाहीर नागरी सत्कार व दहावी, बारावी, नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. रमेश बोरनारे, जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव, साबेर खान, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, शहर प्रमुख राजेंद्र साळुंके, राष्ट्रवादीचे पंकज ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वैजापूर गंगापूर मतदार संघातील प्रत्येक शाळेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी देण्यात येईल असे सांगत जिल्हा नियोजन समितीमार्फत जितके प्रस्ताव वैजापूरातून आले आहेत त्यांना मान्यता देण्यात आली आहे. शेती रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते निधी व नाबार्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करेन असेही खा. भुमरे म्हणाले. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या कर्ज माफीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी आ. रमेश बोरनारे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांची प्रशंसा केली. कार्यक्रमाला रामहरी जाधव, पारस घाटे, दिनेश राजपूत, प्रेम राजपूत, साहेबराव औताडे, गणेश खैरे, सखाहरी बर्डे, नारायण कवडे, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, सुनील कारभारी, प्रकाश मतसागर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील अनेक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
खा. भुमरेंची वैजापूरला गिफ्ट खासदार झाल्यानंतर भुमरे यांनी वैजापूर – गंगापूर मतदार संघातील सहाशे रस्त्यासाठींच्या कामांना मंजुरी दिली असून प्रत्येक रस्त्याची अंदाजित किंमत जवळपास २४ लाख रुपये आहे. याशिवाय २५ कोटी रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉक (गट्टू) च्या कामांना मंजुरी दिली आहे. हे एक प्रकारे वैजापूरकरांसाठी गिफ्ट असल्याने नागरिकांत आनंद व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल खा. संदीपान भुमरे यांनी ही निवडणूक विकासावर होईल असे अपेक्षित होते. परंतु ती तशी न होता वैयक्तिक झाली. एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखी झाली. निवडणुकीसाठी अर्ज भरताना मी एक ते दिड लाख मतांनी निवडून येईल असे सांगितले होते. पण एक्झिट पोलने मला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. याबाबत मीडियानेही मला विचारले होते. पण मला विजयाची खात्री होती. आता कुणावरही टिका करणार नाही. तुम्ही (मतदार) तुमचे काम केले. आता मी माझे काम करणार सर्वांसाठी २४ तास उपलब्ध राहील अशी ग्वाही खा. भुमरे यांनी दिली.



