खान्देश

*मित्र, मित्रत्व आणि मैत्री…*

मित्र, मित्रत्व आणि मैत्री...

काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले; पण मैत्रीचा खरा अर्थ हरवू नये! – डॉ. योगेश आर पाटील

एक मित्र असा हवा, जो वणव्यामध्येही गारव्याची अनुभूती देईल…!

माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही नाती रक्ताची असतात, काही नाती जन्माने जोडली जातात, तर काही नाती मनाने निर्माण होतात. या मनाने जोडल्या जाणाऱ्या नात्यांमध्ये मैत्रीचे नाते सर्वांत सुंदर, निर्मळ आणि विश्वासाचे असते. कारण मैत्री हे असे नाते आहे, जिथे अपेक्षांपेक्षा आपलेपणा, स्वार्थापेक्षा विश्वास आणि शब्दांपेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या असतात.

खरा मित्र कोण असावा? तर एक मित्र असा असावा, जो आयुष्यातील वणव्यात गारव्यासारखा असावा. आपल्या चुका झाल्या तर त्या पाठीशी घालणारा नव्हे, तर त्या चुका समोरासमोर सांगण्याचे धाडस असणारा असावा. आपले मत पटत नसेल तर होकार देणारा नव्हे, तर आपला मतभेद स्पष्टपणे मांडणारा असावा. कारण खरा मित्र आपल्याला खूश करण्यासाठी नव्हे, तर आपल्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी आपल्या सोबत असतो.

मैत्री जपताना कधी एखादा मित्र चुकीच्या मार्गाने जात असेल, तर त्याला योग्य वेळी थांबवणारा मित्र असावा. आपल्या मित्राचा कोणी गैरफायदा घेत असेल, त्याच्या विश्वासाला तडा देत असेल, तर त्याला वेळीच सावध करणारा मित्र असावा. मैत्रीच्या नावाखाली पाठीमागे वार करणारा नव्हे, तर समोर उभे राहून सत्य सांगणारा मित्र हवा.

**मैत्री म्हणजे सुखात टाळ्या वाजवणारे हात नव्हेत, तर दुःखात खांद्यावर आधार देणारे हात होत!*

मित्राच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला, संकट आले, अडचणी निर्माण झाल्या, तर त्यावेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मित्र असावा. आणि जेव्हा मित्राच्या आयुष्यात यश, आनंद, प्रतिष्ठा आणि समृद्धी येते, तेव्हा स्वतःच्या आनंदापेक्षाही मित्राच्या आनंदाला अधिक महत्त्व देणारा मित्र असावा. कारण दुसऱ्याच्या यशात मनापासून आनंद मानता येणे, ही मैत्रीची सर्वांत मोठी कसोटी आहे.

आजच्या आधुनिक युगात मित्र आणि मैत्रीची व्याख्या बदलताना दिसत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजारो मित्रांची यादी असते. वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव होतो, एखादा फोटो पोस्ट केला की लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. मात्र, आयुष्यात एखादे संकट आले, मन अस्वस्थ झाले, आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण निर्माण झाली, तर याच हजारो मित्रांमधून आपली विचारपूस करणारे किती जण असतात?

आपल्या मनातले दुःख कोणताही संकोच न बाळगता ज्याच्याजवळ व्यक्त करता येईल, आपल्या आनंदात मनापासून आनंदी होणारा आणि आपल्या अपयशात आपल्याला पुन्हा उभे करण्याची ताकद देणारा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवा.

८० च्या दशकातील मैत्रीचा विचार केला, तर त्या काळातील मित्रत्वात एक वेगळीच आत्मीयता होती. मित्रासाठी वेळ देणे, त्याच्या अडचणीला धावून जाणे, त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि प्रसंगी मित्रासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची तयारी ठेवणे, ही मैत्रीची भावना होती. त्या काळात साधनांची कमतरता होती, संपर्काची साधने मर्यादित होती; परंतु मनातील आपुलकी आणि नात्यांमधील विश्वास अमाप होता.

आज विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. जग जवळ आले, माणसांमधील अंतर कमी झाले; पण दुर्दैवाने मनामनांमधील अंतर मात्र वाढताना दिसत आहे. संवादाची साधने वाढली, परंतु मनमोकळा संवाद कमी झाला. संपर्क वाढला, पण सहवास कमी झाला. मित्रांची संख्या वाढली, मात्र विश्वासाने मन मोकळे करता येईल असा मित्र शोधणे कठीण झाले आहे.

मैत्रीचे नाते केवळ शाळा, कॉलेज किंवा बाहेरच्या जगापुरते मर्यादित नसते. आई-वडील, भाऊ-बहीण आणि कुटुंबातील व्यक्तींशीही मैत्रीपूर्ण संबंध असणे तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः वडील आणि मुलगा यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले, तर त्या घरातील संवाद अधिक मोकळा होतो. मुलाला आपले प्रश्न, चुका, अडचणी आणि स्वप्ने वडिलांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते. वडिलांचे अनुभव मुलाला मार्गदर्शन करतात आणि मुलाचे विचार वडिलांना नवी दिशा देतात. ज्या घरात नात्यांमध्ये विश्वास आणि मैत्री असते, त्या घराची प्रगती अधिक भक्कम पायावर उभी राहते.

मात्र, मैत्रीच्या नावाखाली होणारा विश्वासघात ही आजची एक गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. मित्रानेच मित्राचा घात केला, मित्राच्या यशाचा मत्सर केला, आर्थिक व्यवहारात फसवणूक केली किंवा वैयक्तिक गोष्टींचा गैरवापर केला, अशा घटना आपण वर्तमानपत्रांतून वाचतो आणि समाजातही पाहतो. त्यामुळे मैत्री करताना माणसाची ओळख त्याच्या बोलण्यावरून नव्हे, तर त्याच्या वागण्यावरून झाली पाहिजे.

खरा मित्र तोच, जो तुमच्या अनुपस्थितीतही तुमचा सन्मान राखतो. तुमच्या चुका जगासमोर मांडण्याऐवजी त्या तुम्हाला एकांतात समजावून सांगतो. तुमच्या यशात मत्सर करत नाही आणि अपयशात तुमच्यापासून दूर जात नाही. तुमच्याकडे काही नसतानाही जो तुमच्या सोबत असतो, मित्राला गुणदोषासह स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने तुमचा खरा मित्र असतो.

माणूस आयुष्यात मोठा होतो, पैसा कमावतो, प्रतिष्ठा मिळवतो, संसार उभा करतो, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करतो. परंतु या सगळ्या धावपळीत त्याने एकदा शांतपणे एकांतात बसून स्वतःला प्रश्न विचारावा की, माझ्या आयुष्यातील ते जुने मित्र आज कुठे आहेत? ज्यांच्यासोबत शाळेच्या कट्ट्यावर बसून तासन्तास गप्पा मारल्या, ज्यांच्यासोबत विनाकारण हसलो, ज्यांच्यासोबत खिशात पैसे नसतानाही आनंदाने दिवस घालवले, ते मित्र आजही आपल्या आठवणीत आहेत का?

खरे तर माणूस किती मोठा झाला यापेक्षा त्याच्या आयुष्यातील माणसे त्याच्याशी किती मनापासून जोडलेली आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण शेवटी माणसाच्या आठवणीत संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेपेक्षा माणसांनी दिलेला सहवास, प्रेम आणि विश्वास अधिक काळ टिकून राहतो.

चारोळी…

ना श्रीमंती पाहावी, ना गरिबीचा विचार करावा,_\
मैत्री करताना फक्त मनाचा ठाव घ्यावा…_\
सुखात तर सारेच सोबत चालतात,_\
दुःखात जो हात धरतो, त्यालाच खरा मित्र म्हणावा\!_

पाठीमागे वार करणारे हजार भेटतील,_\
समोर चूक सांगणारे मात्र फार थोडे असतील…_\
जग जिंकण्याची ताकद प्रत्येकात असेल,_\
पण मित्राचे दुःख आपले मानणारेच खरे मित्र असतील\!_

वणवा पेटला तरी गारवा देणारा हवा,_\
अंधारातही प्रकाशाची वाट दाखवणारा हवा,_\
जगाने साथ सोडली तरी हरकत नाही,_\
पण शेवटपर्यंत मैत्रीचा हात न सोडणारा एक मित्र हवा\!_

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते…

मैत्री ही फक्त ओळखींची गर्दी नसते, ती विश्वासाने जोडलेली माणसे असतात. मित्र किती आहेत, यापेक्षा कठीण प्रसंगी किती मित्र आपल्या पाठीशी उभे राहतात, हे महत्त्वाचे आहे. आयुष्यात हजारो लोक भेटतील, शेकडो जणांशी ओळखी होतील; परंतु मनातील प्रत्येक गोष्ट निःसंकोचपणे सांगता येईल असा एक मित्र मिळणे हे खऱ्या अर्थाने भाग्य असते.

कारण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणसाला आपण किती कमावले यापेक्षा आपण कोणाकोणाच्या आयुष्यात मनापासून जगलो आणि कोण कोण आपल्या आठवणीत जिवंत आहेत, हे अधिक महत्त्वाचे वाटते.

म्हणून मैत्री करा, मैत्री जपा, मित्राच्या यशात आनंद माना, त्याच्या चुकीला विरोध करा; पण त्याच्या विश्वासाचा कधीही घात करू नका.

कारण मित्र बदलू शकतात, काळ बदलू शकतो, परिस्थिती बदलू शकते; पण खऱ्या मैत्रीची किंमत कधीच बदलत नाही

शेवटी परत एकदा मित्र वणव्या मध्ये गाराव्यासारखा

लेखक/पत्रकार
डॉ. योगेश आर पाटील (पत्रकार)
मुख्य संपादक :- न्यूज झेप इंडिया अँड सह्याद्री भूषण
MA.MCJ,BA.DED,CTC,LLB….
*मो. नं.9767211000*

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button