भडगाव RTO ची कमाल! गरीबांना नियमांचा दंडुका, श्रीमंतांना मोकळे रान?
भडगाव RTO ची कमाल! गरीबांना नियमांचा दंडुका, श्रीमंतांना मोकळे रान?
भडगाव प्रतिनिधी :
भडगाव तालुक्यातील RTO कार्यालयाची कार्यपद्धती सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण करत आहे. कायद्याच्या नावाखाली गरीब वाहनधारकांना वेठीस धरले जात असून, प्रभावशाली व श्रीमंत वाहनधारकांना मात्र सरळ सरळ सूट दिली जात असल्याचा गंभीर आरोप जनतेतून होत आहे.
दोनचाकी, जुनाट वाहने किंवा कागदपत्रांतील किरकोळ त्रुटी असलेल्या गरीब, मजूर व शेतकरी वर्गाला अडवून दंड, वाहन जप्ती व धमकीचा सर्रास वापर केला जात असल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे मोठ्या जळाची वाहने, विना नंबर प्लेट वाहने, ट्रॅक्टर्स तसेच आलिशान चारचाकी वाहनांकडे RTO अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
विशेष म्हणजे, नियम मोडणाऱ्या श्रीमंत वाहनधारकांवर कारवाई करण्याऐवजी “ओळख आहे”, “वरचा फोन आहे” अशा शब्दांत प्रकरणे मिटवली जात असल्याचे खुले गुपित बनले आहे. एखाद्याचा फोन आला की वाहन सोडले जाते, तर ज्याला कोणी वाली नाही अशा गरीब वाहनचालक व वाहनधारकांना तासन्तास ताटकळत ठेवले जाते, ही बाब गंभीर चिंतेची आहे.
RTO विभागाचा उद्देश वाहतूक सुरक्षितता व कायद्याची काटेकोर अंमलबजावणी असताना, प्रत्यक्षात मात्र हा विभाग गरीबांसाठी दंड आणि श्रीमंतांसाठी संरक्षण कवच बनत चालल्याची तीव्र खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
या अन्यायकारक, भेदभावपूर्ण व मनमानी कारभाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन भडगाव RTO कार्यालयाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
अन्यथा “कायदा सर्वांसाठी समान” ही संकल्पना फक्त कागदावरच उरणार, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाविरोधात लवकरच सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने जनआंदोलन छेडले जाणार असल्याची चर्चा भडगावात जोर धरू लागली आहे.



