पाचोऱ्यात दिमाखात तिरंगा रॅली; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले

पाचोऱ्यात दिमाखात तिरंगा रॅली; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले
पाचोरा प्रतिनिधी : भारत मातेच्या शौर्याला, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला आणि देशाच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करण्यासाठी पाचोरा शहरात गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रप्रेम घेऊन नागरिक, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.
भारत डेअरी बस स्टॉपपासून रॅलीला सुरुवात
भारत डेअरी बस स्टॉप येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारून गेला.
रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय स्वाभिमान अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तरुणाईसह सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले.
तिरंगा म्हणजे देशाचा स्वाभिमान
तिरंगा हा केवळ भारताचा राष्ट्रध्वज नसून तो देशाचा स्वाभिमान, शौर्य, त्याग, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दि. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या आवाहन कार्यक्रमात पाचोरा-भडगावचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पाचोरा तहसीलदार विजयजी बनसोडे, नायब तहसीलदार विनोद कुमावत आप्पा, संजय गांधी निराधार योजनेचे भरत परदेशी, पोलीस कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, नगरसेवक, शाळांचे शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मधुभाऊ काटे, दत्ता आबा बोरसे, गोविंद शेलार, शरद पाटील, दीपक माने, योगेश पाटील, जगदीश पाटील, समाधान मुळे यांच्यासह मान्यवरांनी नागरिकांना तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
राष्ट्रप्रेमाच्या भावनेने पाचोरा भारावला
गोविंद शेलार, दीपक माने आणि शोभाताई शांतीलाल तेली यांच्या आवाहनालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे शहरातील वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते.
भारत मातेच्या सन्मानासाठी, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाच्या स्मरणासाठी आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत अधिक प्रखर करण्यासाठी पाचोऱ्यात निघालेली ही तिरंगा रॅली राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली



