पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
कन्नड तालुक्यातून अल्पवयीन अपहृत मुलीची सुखरूप सुटका; संशयित मुलगा पोलिसांच्या ताब्यात

कन्नड तालुक्यातून अल्पवयीन अपहृत मुलीची सुखरूप सुटका; संशयित मुलगा पोलिसांच्या ताब्यात
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करताना पाचोरा पोलिसांनी तत्परता आणि कौशल्य दाखवत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून पीडित मुलीची सुखरूप सुटका केली आहे. तसेच या प्रकरणातील संशयित मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पीडित मुलगी संशयित मुलासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टापरगाव शिवारातील एका शेतात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ठिकाणाची खात्री करून पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी आणि पोलीस कॉन्स्टेबल मजीद पठाण यांनी तातडीने टापरगाव शिवार गाठले.
पोलिसांनी संबंधित शेतात शोधमोहीम राबवून तेथे लपून बसलेल्या पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. तसेच संशयित मुलालाही ताब्यात घेऊन दोघांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.
पाचोरा पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक!
गोपनीय माहितीचे अचूक संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि वेळेत केलेली कारवाई यामुळे अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले. मुलगी सुखरूप मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले असून, पाचोरा पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.



