पाचोऱ्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोऱ्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रांबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन
पाचोरा प्रतिनिधी : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच पोलीस भरती प्रक्रियेसाठी त्यांना सक्षमपणे तयार करता यावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित (जळगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) यांच्या संकल्पनेतून सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता शहरातील स्व. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी भवनाच्या सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, प्रा. राजेंद्र चिंचोले, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, योगेश गणगे, प्रा. दिनेश तांदळे यांच्यासह जळगाव पोलीस दलाचे डी. आय. पथक उपस्थित होते.
शिबिरामध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली मैदानी परीक्षा, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक क्षमता वाढविण्याचे तंत्र तसेच भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. केवळ परीक्षा देण्यापुरती तयारी न करता नियोजनबद्ध अभ्यास, नियमित मैदानी सराव आणि शिस्त यांचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
लेखी परीक्षेबाबत पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांनी मार्गदर्शन केले. मैदानी सराव व शारीरिक चाचणीबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय दाभाडे यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. भरती प्रक्रियेत आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत विजय सोनवणे, सुनील निकम व कार्यालयीन स्टाफ यांनी मार्गदर्शन केले.
तसेच ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अली सय्यद, महिला हेड कॉन्स्टेबल मेघना जोशी, डी. आय. संदीप पाटील आणि डी. आय. अजित तडवी यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित उमेदवारांना भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्या.
यावेळी पाचोरा-भडगाव परिसरातील नामांकित क्रीडाशिक्षक तसेच क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवरही उपस्थित होते. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने शिबिराला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. पोलीस भरतीतील संभाव्य अडचणी, लेखी परीक्षेचे स्वरूप, मैदानी चाचणीची तयारी आणि आवश्यक कागदपत्रे याविषयी एकाच ठिकाणी सविस्तर माहिती मिळाल्याने उमेदवारांना या शिबिराचा मोठा लाभ झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल हरिष परदेशी, गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी असे प्रशिक्षण शिबिर निश्चितच दिशादर्शक ठरणार असून, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर तरुणांना आपले ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.



