भडगाव परिसरात हिरव्या झाडांची सर्रास कत्तल !
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात; नागरिकांमध्ये संताप

भडगाव परिसरात हिरव्या झाडांची सर्रास कत्तल !
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात; नागरिकांमध्ये संताप
भडगाव – प्रतिनिधी : भडगाव शहरासह ग्रामीण भागात हिरव्या गार झाडांची बिनधास्तपणे कत्तल सुरू असून, वनविभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासनाच्या “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणांचा केवळ कागदोपत्री वापर होत असून प्रत्यक्षात मात्र दिवसाढवळ्या झाडांची तोड करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक केली जात असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून, वाढते तापमान आणि तीव्र उष्णतेमागे हीच वृक्षतोड कारणीभूत असल्याचे पर्यावरणप्रेमी व जाणकारांचे मत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात अनुभवलेल्या विक्रमी तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते.
वनविभागाचे अधिकारी जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे हिरव्यागार झाडांची कत्तल सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “जनतेने ठरविले तर अधिकाऱ्यांना जागेवर आणायला वेळ लागणार नाही, मात्र नागरिक तमाशा पाहत बसतात,” अशी तीव्र प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
लाकूड तस्करांचे मनोबल इतके वाढले आहे की त्यांना कोणत्याही कारवाईची भीती उरलेली नसल्याचेही बोलले जात आहे. प्रशासनाने वेळेत कठोर कारवाई केली नाही तर भविष्यात आणखी गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.



