पाचोरा येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षेचे यशस्वी आयोजन

पाचोरा येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षेचे यशस्वी आयोजन
पाचोरा (दि. 29 मार्च 2026) – येथील पिके शिंदे माध्यमिक विद्यालय, पुनगाव रोड येथे भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व सुव्यवस्थित वातावरणात पार पडली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या परीक्षेत सहभाग घेत उत्कृष्ट शिस्तीचे दर्शन घडवले.
या परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून राजेंद्र राठोड यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच पर्यवेक्षक म्हणून पुरुषोत्तम पाटील, दिनेश पाटील, हितानंद जोशी, कविता जोशी, कविता चव्हाण, उज्वला सोनार, श्रीराम जाधव, वाल्मीक शिंदे, भास्कर तायडे आणि राजेंद्र बबन राठोड यांनी अत्यंत कुशलतेने आपले कर्तव्य पार पाडले.
परीक्षेच्या आयोजनाबाबत पालकांनी समाधान व्यक्त करत भविष्यातही अशाच शिस्तीत स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमात निर्मल इंटरनॅशनल स्कूल, शिंदे इंटरनॅशनल स्कूल, न्यू बुरानी स्कूल, वर्ड स्कूल, पिके शिंदे माध्यमिक व प्राथमिक स्कूल, गुरुकुल बुरानी स्कूल तसेच पाचोरा तालुक्यातील पीएम श्री कुऱ्हाड खुर्द, साजगाव, गोराडखेडा, रंगी माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा नांद्रा, वावडदा, बिलवाडी आणि आचार्य गजानन गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी आदी शाळांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
बीटीएस परीक्षा राबवणारी एज्यूमेट अकॅडमी व पाचोरा तालुक्यातील संपूर्ण टीमचे याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.
या परीक्षेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी इस्रो सहलीची संधी दिली जाणार आहे. या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडवून देशाच्या प्रगतीसाठी सक्षम व जबाबदार नागरिक तयार करण्याचा उद्देश आहे.
परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.



