तांदळवाडीत संविधान दिनानिमित्त भव्य सोहळा उत्साहात संपन्न

तांदळवाडीत संविधान दिनानिमित्त भव्य सोहळा उत्साहात संपन्न
संविधान सन्मान यात्रा, २६/११ शहीदांना श्रद्धांजली; पत्रकारांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
भडगाव तालुका प्रतिनिधी (संजय शेवाळे)
भडगाव तालुक्यातील तांदळवाडी येथे २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आदित्य चंदू जाधव यांच्या संकल्पनेतून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाचा सन्मान, सामाजिक एकता आणि देशभक्तीचा संदेश देणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक तसेच प्रा. पंकज कुमार नन्नवरे उपस्थित होते. यावेळी परिसरातील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला. टीव्ही ट्रेन लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक दिलीप पाटील, उपमुख्य संपादक लक्ष्मीकांत देसले, लोकमतचे पत्रकार अशोक बापू परदेशी, रतिलाल पाटील, संजय महाजन, भानुदास महाजन, संजय शेवाळे यांच्यासह पत्रकार बांधवांचा गौरव करण्यात आला.
गावातील धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आपुलकीच्या माणसांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नानासाहेब तसेच डॉ. रवींद्र दयाराम निकम उपस्थित होते. आदिवासी बांधवांना भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा आदित्य चंदू जाधव यांच्याकडून सप्रेम भेट देण्यात आल्या. या उपक्रमातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेला सन्मान देण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
प्रा. पंकज कुमार नन्नवरे, डॉ. रवींद्र दयाराम निकम आणि टीव्ही ट्रेन लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक दिलीप पाटील आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्त्व, सामाजिक सलोखा, एकता, बंधुता आणि राष्ट्रप्रेम यावर विचार व्यक्त केले.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण कार्यक्रम कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेला नसून, तांदळवाडी गावातील आदित्य चंदू जाधव यांच्या संकल्पनेतून संविधानाचा सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
मोठ्या उत्साहात, आपुलकीच्या वातावरणात आणि सामाजिक एकतेच्या भावनेत हा कार्यक्रम संपन्न झाला.



