पाचोऱ्याचे ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲड. अंकुश कटारे यांना राज्यस्तरीय ‘बोधिमित्र स्टार पुरस्कार’

पाचोऱ्याचे ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲड. अंकुश कटारे यांना राज्यस्तरीय ‘बोधिमित्र स्टार पुरस्कार’
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त पुणे येथे होणार पुरस्काराने सन्मानित
पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा येथील ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲड. अंकुश भगवान कटारे यांना पुणे येथील बोधिमित्र पीपल्स वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने सन २०२६ चा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘बोधिमित्र स्टार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
ॲड. अंकुश कटारे हे गेल्या २३ वर्षांपासून पाचोरा न्यायालयात वकिली व्यवसाय करीत असून, त्यांनी विधी क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. ते पंचशील बहुउद्देशीय शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष, पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे सचिव तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
विधी व्यवसायासोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सामाजिक प्रबोधन करणे तसेच शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बोधिमित्र पीपल्स वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. गौतम वनजे राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे आणि मा. शितल यशोधरा उपस्थित राहणार आहेत.
ॲड. अंकुश कटारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील विधी, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



