खान्देश

साहिल वाकोडे मृत्यूची स्वतंत्र चौकशी करा; जातीय छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी!

साहिल वाकोडे मृत्यूची स्वतंत्र चौकशी करा; जातीय छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी

जळगाव : IIT मुंबई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या दुर्दैवी मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या जातीय छळ, अपमान, शिवीगाळ व मानसिक त्रासाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, IIT मुंबईसारख्या प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थेत साहिल वाकोडे यांचा झालेला मृत्यू अत्यंत गंभीर बाब आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी त्याला जातीय अपमान, शिवीगाळ व मानसिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
साहिलने पहिल्या सेमिस्टरमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याच्या मृत्यूनंतर तपास पूर्ण होण्यापूर्वीच परीक्षेत कॉपी केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे कथन करण्यात आले. त्यानंतर IIT मुंबई प्रशासनाने अशा प्रकारे निष्कर्ष मांडणे अयोग्य असल्याचे मान्य करून माफी मागितल्याचे तसेच संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“केवळ माफी किंवा निलंबनाने विषय संपत नाही”
एका विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर केवळ माफी किंवा निलंबनाने हा विषय संपत नाही. साहिल वाकोडे यांच्या मृत्यूमागील प्रत्येक बाबीची सत्यता निष्पक्ष चौकशीतून समोर आणून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका ॲड. कटारे यांनी निवेदनातून मांडली आहे.
उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, जातीय भेदभाव, अपमान किंवा मानसिक छळामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणाच्या परिसरात असुरक्षित वाटू नये, यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रमुख मागण्या
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, कुटुंबीयांनी केलेल्या जातीय छळाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, तपास पूर्ण होण्यापूर्वी मृत विद्यार्थ्यावर दोषारोप करणाऱ्या वक्तव्यांची जबाबदारी निश्चित करावी, कुटुंबीयांना आर्थिक मदत व आवश्यक न्यायिक सहकार्य द्यावे, तसेच IIT, केंद्रीय विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाविरोधात स्वतंत्र, पारदर्शक व प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रवीण सुरवाडे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, आनंद विठ्ठल बागुल, ॲड. मयूर निकम, सिद्धार्थ दौलत बागुल, ॲड. प्रदीप सूर्यवंशी, एकनाथ लखा सोनवणे, जगदीश गाडे, प्रदीप सोनवणे, राजू भोसले यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button