दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रवेश व संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा!

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रवेश व संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा
छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन
**पाचोरा, दि. २८ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्क नव्हे, तर प्रवेश शुल्कासह संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटना, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांच्यावतीने करण्यात आली.
याबाबत पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पीक उगवलेले नसल्याने त्यांच्या उत्पन्नाचे साधनच संकटात आले आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा, हा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
सरकारने केवळ परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना अपेक्षित आर्थिक दिलासा मिळणार नाही. कारण परीक्षा शुल्काच्या तुलनेत प्रवेश शुल्क व संपूर्ण शैक्षणिक शुल्काची रक्कम मोठी असते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क तसेच संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी ठोस मागणी छात्रभारतीने केली आहे.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये, तसेच कोणत्याही कुटुंबावर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने तातडीने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
“फक्त परीक्षा शुल्क माफ करू नका; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क आणि संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहता कामा नये,” अशी भूमिका छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मांडली.
यावेळी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष भूषण पाटील यांच्यासह **किरण रवींद्र शिरसाट, भालचंद्र पाटील, गौरव पाटील, वैभव कुंभार, भूमिकेश तावडे, रोहित कुंभार, जय सूर्यवंशी, रुपेश पाटील, यश बोबडे, रोशन साळुंखे, मयूर पाटील आदी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



