जि.प. मराठी शाळा गोराडखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची प्रेरणादायी भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

जि.प. मराठी शाळा गोराडखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची प्रेरणादायी भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक
गोराडखेडा | प्रतिनिधी – जि.प. मराठी शाळा, गोराडखेडा येथे जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी **श्रीमती करिश्मा नायर** यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. त्यांच्या भेटीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
भेटीदरम्यान त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या **पोषण आहाराची पाहणी** केली. विद्यार्थ्यांशी पोषण आहाराबाबत संवाद साधत त्यांनी भोजनाची चवही चाखली आणि त्याबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर **निपुण महाराष्ट्र अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत** शिक्षकांशी सविस्तर चर्चा करून अध्यापनाच्या विविध बाबींचा आढावा घेतला.
यानंतर श्रीमती नायर यांनी इयत्ता सहावीच्या वर्गाला भेट देऊन सुरू असलेल्या गणिताच्या अध्यापनाची पाहणी केली. विद्यार्थ्यांना गणितावरील विविध प्रश्न विचारले असता त्यांनी आत्मविश्वासाने व अचूक उत्तरे देत गणिती उदाहरणे सोडवून दाखविली. विद्यार्थ्यांची बौद्धिक तयारी, आत्मविश्वास आणि विषयावरील पकड पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
तसेच निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा नियमित सराव होतो का, तासिका वेळापत्रकानुसार अध्यापन केले जाते का, याबाबतही त्यांनी शिक्षकांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांचा वाचन सराव घेतला. उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी मनापासून कौतुक करत त्यांना शाबासकी दिली.
या भेटीतील एक विशेष प्रसंग सर्वांच्या स्मरणात राहिला. शाळेतून निघाल्यानंतर वाहनात बसल्यानंतरही इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी दिलेली अचूक गणिती उत्तरे त्यांच्या लक्षात राहिली. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा बोलावून त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत पेन भेट स्वरूपात बक्षीस दिले. हा प्रेरणादायी क्षण विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
यावेळी शाळेतील शिक्षक सुरेश पाटील, स्वाती महाजन, योगिता चौधरी, हरिश्चंद्र मुंडे आणि गौरव येवले उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याला निश्चितच बळ मिळणार असल्याचा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.



