गोल्डन सुपर स्टार सिंगिंग स्पर्धेत धनश्री व सिद्धी कुलकर्णी यांचे घवघवीत यश

गोल्डन सुपर स्टार सिंगिंग स्पर्धेत धनश्री व सिद्धी कुलकर्णी यांचे घवघवीत यश
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून परिचित असलेले श्री. विनोद भाऊ कुलकर्णी यांच्या कन्या धनश्री कुलकर्णी व सिद्धी कुलकर्णी यांनी आपल्या गायन कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
स्वर मंजिरी म्युझिक ग्रुप, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “गोल्डन सुपर स्टार – सीझन ८” या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत धनश्री व सिद्धी या दोन्ही बहिणींनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण यश मिळविले. यावेळी त्यांना गोल्डन ट्रॉफी तसेच ₹१०,००० रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून तब्बल १३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून प्रथम टॉप ३५, त्यानंतर टॉप १० स्पर्धकांची निवड करण्यात आली. या अंतिम फेरीत धनश्री व सिद्धी या दोघी बहिणींनी आपल्या सुरेल आवाजाने, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि उत्कृष्ट गायन कौशल्याने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.
या यशामुळे पाचोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, दोन्ही बहिणींवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे तसेच त्यांचे पालक श्री. विनोद भाऊ कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.
कला, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



