पुरामुळे शिंदाड, निंभोरी, राजुरी, वाडी व शेवाळे गावात मोठे नुकसान !

पुरामुळे शिंदाड, निंभोरी, राजुरी, वाडी व शेवाळे गावात मोठे नुकसान – वैशालीताई सुर्यवंशींची पाहणी
पाचोरा:-तालुक्यातील शिंदाड, निंभोरी, राजुरी, वाडी व शेवाळे ,आर्वे , लोहारी खु इत्यादी गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले असून जनावरांचेही प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. काही गुरेढोरे वाहून गेली आहेत तर घरांचे, शेतमालाचे व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी नुकतीच केली. सकाळी ७:०० वाजेपासून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. शेतकरी व गावकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष अनुभवताना त्या म्हणाल्या की, “गावोगावी मोठ्या प्रमाणात शेती व जनावरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देणारे मदतकार्य सुरू करावे.”
तसेच, गावकऱ्यांना दिलासा देत त्यांनी आश्वासन दिले की भाजप पक्ष व स्थानिक कार्यकर्ते आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहतील. पुरामुळे झालेल्या नुकसानीची योग्य ती नोंद घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्यांनी प्रशासनाला ठाम मागणी केली.
गावकऱ्यांनीही या वेळी आपल्या अडचणी वैशालीताई समोर मांडल्या. शेतमाल, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू, रस्त्यांचे नुकसान या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून झाली.
राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन दुपारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.



