पाचोरा अनुदान घोटाळा : निर्दोष शेतकऱ्यांना टार्गेट, खरे सूत्रधार मोकाट – प्रशासनाच्या बेफिकीर कारभारावर संताप

पाचोरा अनुदान घोटाळा : निर्दोष शेतकऱ्यांना टार्गेट, खरे सूत्रधार मोकाट – प्रशासनाच्या बेफिकीर कारभारावर संताप
**पाचोरा, दि. १२ (विशेष प्रतिनिधी): पाचोरा तहसील कार्यालयातील कोट्यवधी रुपयांच्या शेतकरी अनुदान घोटाळ्याचा गोंधळ दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घोटाळ्याचे खरे सूत्रधार अद्यापही मोकाट आहेत, तर प्रशासन निर्दोष शेतकऱ्यांनाच आरोपीसारखी वागणूक देत आहे. “करे कोई, भरे कोई” अशा पद्धतीने जबाबदार अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी टाळण्याचा प्रकार उघड होत आहे.
खरे आरोपी सुटले, शेतकरी वेठीस
२०२२ ते २०२४ या काळात तब्बल १ कोटी २० लाखांचा निधी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व एजंटांनी लाटला. महसूल सहाय्यक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांची नावे पुढे आली असली तरी, या घोटाळ्यामागचे खरे मास्टरमाइंड अजूनही अज्ञातच आहेत. आरोपी मोकाट फिरत असताना, प्रशासन मात्र पीडित शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने लेखी जबाब घेऊन वसुलीची कारवाई करत आहे.
प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर संताप
पीडित शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमांवर कोणत्याही योजनेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे रक्कम कोणत्या योजनेची आहे हे न कळल्याने काहींनी ती खर्च केली, तर काहींकडून आरोपींनीच पैसे परत घेतले. तरीही वसुलीचा फटका निर्दोषांनाच बसत आहे.
नागरिकांचा थेट सवाल – *”लाखो-कोट्यवधींचा निधी लाटणाऱ्यांना सोडून प्रशासन गरीब शेतकऱ्यांवर इतके का तुटून पडते? नोटीस पाठवण्याइतकी तत्परता खऱ्या आरोपींना पकडण्यात का दाखवली जात नाही?”*
शेतकरी संघटनांची संशयास्पद शांतता
निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांच्या नावाने रस्त्यावर उतरणाऱ्या संघटना आज मात्र गप्प बसल्या आहेत. निर्दोष शेतकऱ्यांवरील हा अन्याय थांबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा प्रशासनाविरोधातील संताप उग्र रूप धारण करेल, यात शंका नाही.
पत्रकार संदीप महाजन यांची भूमिका : _
पत्रकार संदीप महाजनांचा मुळाशी जाण्यासाठी व शेतकरी अनुदान लाटण्यास मदत करणा-या व सध्या मोकाट सुटलेल्यांसाठी लढा सुरु आमरण उपोषणाचे फलिताने गुन्हा दाखल ! तर नुकताच आत्मदहनाचा दिला इशारा दोनदा स्थगित लवकरच आत्मदहन करणार असल्याची सूत्रांची माहिती .



