आर्वे शिवारातील गुरचरण जमिनीवरील बेकायदा बांधकाम; तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर होणार !

आर्वे शिवारातील गुरचरण जमिनीवरील बेकायदा बांधकाम; तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर होणार
पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारातील शासकीय गुरचरण जमिनीवर एका शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या बेकायदेशीर बांधकामाचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील भूमाफियांवर प्रशासनाचा वचक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाच्या नोटीसकडे दुर्लक्ष
लोहारी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आर्वे शिवारातील शासकीय मालकीच्या गुरचरण जमिनीवर ‘तुळजाई शिक्षण संस्थे’ने कोणतेही पूर्वपरवानगी न घेता बांधकाम सुरू केले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले की, संबंधित संस्थेला बांधकाम थांबवण्यासाठी यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, संस्थेने या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवले. प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने आता हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित देण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्याचा पाठपुरावा
या बेकायदेशीर बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांनी महिन्याभरापूर्वीच तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी या तक्रारीच्या प्रती राज्याचे संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले होते.
सर्वांचे लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे
विशेष म्हणजे, संस्थेने आधी गुरचरण जमिनीवर बांधकाम सुरू केले आणि त्यानंतर जागेच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला असल्याचे तहसीलदार बनसोडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता जिल्हाधिकारी या जागेला परवानगी देतात, की हे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित (हटवण्याचे) आदेश देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



