साई समर्थ कॉलनी झाली प्रकाशमय; नागरिकांमधून समाधान

साई समर्थ कॉलनी झाली प्रकाशमय; नागरिकांमधून समाधान

पाचोरा, प्रतिनिधी (संजय शेवाळे): येथील गिरणा पंपिंग रोडवरील जाधव वाडीजवळ असलेल्या साई समर्थ कॉलनीत अनेक दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मात्र, ठेकेदार सागर अशोक पाटील आणि पाचोरा नगरपालिकेच्या सकारात्मक पुढाकारामुळे अखेर या कॉलनीतील अंधार दूर झाला असून, सर्वत्र दिवे लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
साई समर्थ कॉलनीतील रहिवासी पथदिव्यांच्या समस्येसाठी गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेकडे पाठपुरावा करत होते. या समस्येमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
अखेरीस, या समस्येची दखल घेत ठेकेदार सागर अशोक पाटील यांनी स्वतः कॉलनीला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ नगरपालिकेचे अभियंता योगेश रेवेदार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. अभियंता रेवेदार यांनीही यावर तातडीने कार्यवाही करत आपल्या टीमसह कॉलनीत धाव घेतली आणि सर्व खांबांवर दिवे बसवण्याचे काम पूर्ण केले.
या कामासाठी ठेकेदार सागर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्यासोबत सागर खैरनार, महेश पाटील आणि गोपाल भाऊ यांनीही मदत केली.
कॉलनीतील अंधार दूर झाल्यामुळे पत्रकार संजय शेवाळे, सुपरवायझर भूषण निंबा पाटील यांच्यासह साई समर्थ कॉलनी आणि जाधव वाडीतील सर्व नागरिकांनी ठेकेदार सागर पाटील, अभियंता योगेश रेवेदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवरे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



