
पाचोरा: तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि अमानुष घटनेच्या निषेधार्थ, सकल हिंदू समाज आणि विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी पाचोरा शहरात एका भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या घटनेमुळे केवळ पिंपळगाव हरेश्वरच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे.
सकाळी १० वाजता पाचोऱ्यातील कृष्णापुरी येथील बजरंग बली मंदिरातून या मोर्चाला सुरुवात होईल आणि मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होणार आहे. आयोजकांनी हा मोर्चा केवळ एक निषेध कार्यक्रम नसून, ‘लव्ह-जिहाद’ विरोधातील आणि हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा लढा असल्याचे म्हटले आहे.
या मोर्चासाठी सकल हिंदू समाज, पाचोरा आणि हिंदू समाजातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मानवतेचा अभिमान बाळगणाऱ्या आणि ‘लव्ह-जिहाद’ विरोधी विचारांच्या सर्व नागरिकांना सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्ध हिंदुत्ववादी वक्ते आणि गुरु गोरक्षनाथ आखाड्याचे महंत श्री. योगी दत्तनाथजी महाराज हे या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “घरात बसून केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहण्याऐवजी, हिंदू धर्मासाठीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची हीच वेळ आहे. हा केवळ पिंपळगाव परिसराचा नव्हे, तर संपूर्ण हिंदू धर्माच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आज जर आपण अन्याय सहन केला, तर उद्या पुन्हा कोणाच्या तरी बहिणीवर किंवा मुलीवर हात टाकला जाईल. त्यामुळे आज हिंदू धर्माची एकजूट दाखवणे अत्यावश्यक आहे.”
या मोर्चाच्या माध्यमातून पीडित बालिकेला न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी तीव्र मागणी केली जाणार आहे. प्रशासनाने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी आयोजकांनी नियोजन केले आहे.



