हडसन – पहाण परिसरात रानडुकरांचा हैदोस; शेतकऱ्याचे ५० ते ६० टक्के नुकसान, तात्काळ भरपाई देण्याची मागणी !

हडसन – पहाण परिसरात रानडुकरांचा हैदोस; शेतकऱ्याचे ५० ते ६० टक्के नुकसान, तात्काळ भरपाई देण्याची मागणी
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा, (प्रतिनिधी): तालुक्यातील हडसन शिवारात रानडुकरांच्या कळपाने उच्छाद मांडला असून, येथील एका शेतकऱ्याच्या उभ्या मका पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्याचे जवळपास ५० ते ६० टक्के नुकसान झाले असून, तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याप्रकरणी वनविभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हडसन येथील रहिवासी उषाबाई अतुलसिंग पाटील यांच्या मालकीची गट नंबर ५१/१ मध्ये चार एकर शेती आहे. ही शेती देवीदास दामू पाटील हे कसत आहेत. त्यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने आणि हजारो रुपये खर्च करून मका पिकाची लागवड केली होती. पीकही जोमदार आले होते. मात्र, काल रात्री परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने देवीदास पाटील यांना शेताकडे जाता आले नाही. याच संधीचा फायदा घेत रानडुकरांच्या कळपाने त्यांच्या शेतात शिरून जवळपास दोन ते तीन एकर क्षेत्रातील मका पिकाची पूर्णतः नासधूस केली.
सकाळी शेतात गेल्यावर पिकाचे झालेले नुकसान पाहून देवीदास पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी सांगितले की, “पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी दिवस-रात्र शेतात राबून पीक वाढवले होते. हजारो रुपये खर्च केले, पण आता सर्व मातीमोल झाले आहे. ऐन तोंडी आलेला घास या रानडुकरांनी हिसकावून नेला.” या प्रकारामुळे पाटील कुटुंबीय पूर्णपणे खचून गेले आहे.
परिसरातील अनेक गावे त्रस्त, जंगलक्षेत्राला कुंपणाची मागणी
या परिसरात केवळ हडसनच नव्हे, तर नांद्रा, पहान, आसनखेडा, मोहाडी, लाख आणि बांबरूड राणीचे या गावांना नेहमीच जंगली प्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. या गावांना लागून असलेल्या वनक्षेत्रातून रानडुकरे, हरीण आणि इतर प्राणी सर्रासपणे शेतात घुसून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे या संपूर्ण जंगल परिसराला तारेचे कंपाऊंड घालून प्राण्यांचा शेतातील शिरकाव कायमचा थांबवावा, अशी एकमुखी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
“वनविभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन आमच्या नुकसानग्रस्त पिकाचा त्वरित पंचनामा करावा आणि योग्य ती भरपाई मिळवून द्यावी,” अशी विनंती देवीदास पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली



