घरकुल हप्त्यासाठी लाच घेताना ग्रामसेवक आणि रोजगारसेवक एसीबीच्या जाळ्यात !

घरकुल हप्त्यासाठी लाच घेताना ग्रामसेवक आणि रोजगारसेवक एसीबीच्या जाळ्यात !
पाचोरा: घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि गट नंबर नमुना आठ मिळवण्यासाठी ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना एका ग्रामसेवकासह दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी रंगेहात पकडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, ग्रामसेवक, माणकी आणि अंतुर्ली बुद्रूक, ता. भडगाव) आणि जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रोजगारसेवक, गाव माणकी, ता. भडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
भडगाव तालुक्यातील माणकी येथील ३५ वर्षीय तक्रारदाराला मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा आणि गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी या आरोपींनी ६,००० रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली.
तडजोडीनंतर ५,००० रुपये स्वीकारताना दोन्ही संशयित आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हेमंत पाटील आणि सुभाष पावरा यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



