खान्देश
नांद्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजन !

नांद्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजन !
पाचोरा, (संजय पाटील): पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या २७ जून, २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत नांद्रा येथील कल्याणदासजी महाराज मंदिर, माऊली हार्डवेअर व तलाठी कार्यालयाच्या मागे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. ‘ग्रामीण फास्ट’तर्फे आयोजित या शिबिरात विविध सरकारी विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे.
या शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा:
- संजय गांधी योजना शाखा: संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन आणि श्रावणबाळ योजनांसारख्या योजनांची सविस्तर माहिती, अर्ज सादर करण्याची सुविधा आणि पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जातील.
- पुरवठा विभाग: शिधापत्रिकेतून नाव कमी/जास्त करणे, नवीन शिधापत्रिका मिळवणे, अन्नधान्य सुरू करणे आणि शिधापत्रिकेसंबंधी योग्य माहिती मिळेल.
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करता येतील, पूर्वीच्या अर्जातील त्रुटींचे निरसन केले जाईल आणि योजनेची माहिती मिळेल.
- कृषी विभाग: विविध कृषी योजनांचे अर्ज भरले जातील. शेती अवजारे, पाईप, ठिबक सिंचन यांसारख्या बाबींवर माहिती व अर्ज उपलब्ध असतील.
- वीज वितरण विभाग (MSEB): नवीन मीटर जोडणी, नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज करता येतील. थकीत बिले आणि इतर शंकांचे निरसन केले जाईल. कुसुम सौर योजना आणि सूर्यघर सौर योजनांची माहिती मिळेल.
- पंचायत समिती विभाग: अनुदान विहीर मागणी, शेड मागणीची माहिती मिळेल आणि पात्र अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जातील. पंचायत समिती अंतर्गत सर्व योजनांची माहिती व अर्ज उपलब्ध असतील. गोठा शेड आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीची माहितीही दिली जाईल.
- वन विभाग/सामाजिक वनीकरण: वन विभागातील सर्व योजनांची माहिती मिळेल आणि अर्ज स्वीकारले जातील. वृक्षारोपण आणि मोफत रोपवितरण याबद्दल माहिती दिली जाईल.
- भूमी अभिलेख विभाग: शेतजमिनीच्या मोजणीसाठी अर्ज सादर करता येतील. प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा केला जाईल आणि दाखल केलेल्या अर्जांची सद्यस्थिती जाणून घेता येईल.
- आपले सरकार सेवा केंद्र/CSC केंद्र: उत्पन्न दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर, जातीचे दाखले इत्यादीसाठी अर्ज स्वीकारले जातील. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळेल.
- राष्ट्रीयीकृत बँक: नवीन बँक खाते उघडता येईल आणि बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाबाबत मार्गदर्शन मिळेल.
- महसूल विभाग: तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) यांच्याकडून ७/१२ उतारा आणि उत्पन्न दाखला मिळेल. महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळेल.
- परिवहन विभाग (RTO): ड्रायव्हिंग परवाना मिळवता येईल. वाहनांची नोंदणी करता येते आणि नवीन नंबर प्लेट्सबद्दल माहिती मिळेल.
- परिवहन महामंडळ: विद्यार्थ्यांसाठी पासेस मिळवता येतील. शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळेल, ज्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच्या योजनांचा समावेश आहे.
- पोलीस/वाहतूक शाखा: विविध कायद्यांची आणि रस्ते वाहतुकीचे नियम व सुरक्षेबद्दल माहिती मिळेल.
- वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय: आरोग्याची काळजी घेण्यासाठी माहिती मिळेल. विविध मोफत शस्त्रक्रियांसाठी लागणारी कागदपत्रे कोणती, याबाबत माहिती मिळू शकते. तसेच बीपी आणि शुगरची तपासणी करता येईल.
- महिला व बाल विकास विभाग: ‘लाडकी बहीण मानधन’ योजनेसह महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती मिळेल.
- शिक्षण विभाग/गटशिक्षणाधिकारी: मुलांना शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन मिळेल.
- पशुवैद्यकीय विभाग: शेतकरी बांधवांसाठी पशुपालनाच्या योजना, सबसिडी आणि लसीकरणाबाबत माहिती मिळू शकते.
- बी.एस.एन.एल विभाग: मोबाईल किंवा लँडलाईन जोडणी, वायफाय/डेटा कनेक्शन प्लॅनबद्दल माहिती मिळेल.
- नगरपालिका: प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, महिला बचत गट नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, मालमत्ता उतारा, तक्रार निवारण, नवीन नळ जोडणी, बांधकाम परवानगी इत्यादी सेवांचा लाभ घेता येईल.
- सहकार विभाग: सोसायटी कर्जाबद्दल माहिती मिळेल.
या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “आम्ही येत आहोत, आपण पण या” या घोषवाक्यसह, नागरिकांना या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे.



