पाचो-यात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेत भक्तिमय वातावरणात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

पाचोर्यात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेत भक्तिमय वातावरणात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी
अनेक तरुणांनी माळकरी होण्याचा घेतला संकल्प; पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती
पाचोरा (वार्ताहर): पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेत गुरु पौर्णिमेचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ह.भ.प. सुनीताताई पाटील व भागवताचार्य ह.भ.प. योगेशजी महाराज धामणगावकर यांच्या माध्यमातून समाजात अध्यात्म, संस्कार आणि वारकरी परंपरेचे बीजारोपण करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण व विद्यार्थी आध्यात्मिक संस्कारांनी घडत असून, त्याच कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार हरिनाम, भजन, अभंग आणि संतवाणीने झाली. परिसरातील विविध भजनी मंडळांनी आपल्या सुरेल भजनांनी वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज तसेच गुरु परंपरेचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थितांनी आपल्या गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
“गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा श्वास आणि जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक.”
गुरुंच्या पवित्र चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून, त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात ज्ञान, सद्बुद्धी, भक्ती, यश, सुख आणि समृद्धी नांदो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥”
🌸 गुरु पौर्णिमेच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 🌸
– लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा
ह.भ.प. सुनीताताई पाटील व भागवताचार्य ह.भ.प. योगेशजी महाराज धामणगावकर म्हणजे …
ज्ञान • संस्कार • भक्ती • वारकरी परंपरेचा संगम …..
यावेळी भागवताचार्य ह.भ.प. योगेशजी महाराज धामणगावकर यांनी गुरु महिमा, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायातील गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भजन, अभंग व हरिपाठ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुरु हे ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या सोहळ्यास पाचोरासह मोंढाळे, पुंगाव, मानकी, अंतुरली, बांबरुड, लोटाहार, चिंचखेडे, खडकदेवडा तसेच बाहेरपुरा, कृष्णापुरी, सिंधी कॉलनी आदी परिसरातील भाविक, वारकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक युवकांनी वारकरी संप्रदायाची माळ धारण करून आध्यात्मिक, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाला पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजयजी बनसोडे, रमेशजी मोर, दगाजी महाराज बिल्डीकर, महादू महाराज, मदन महाराज, श्रीराम नाना महाजन, अशोक आप्पा महाजन, भास्कर अण्णा, शोभाताई चौधरी, ओझर येथील ग्रामस्थ तसेच पुंगाव येथील चिंतामण पाटील, प्रल्हाद गुजर यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण सोहळ्याचे नियोजन लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा यांच्या वतीने उत्कृष्टरीत्या करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ह.भ.प. सुनीताताई पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, भाविक, वारकरी आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच सर्वांच्या आशीर्वादाने वारकरी भवनाचे कार्य अधिक जोमाने पुढे सुरू राहावे, अशी भावनिक साद त्यांनी उपस्थितांना घातली. भक्ती, संस्कार आणि अध्यात्माचा संदेश देणारा हा गुरु पौर्णिमेचा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



