प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी — पाचोऱ्यात समता सैनिक दलाचे उपोषण आंदोलन पाचव्या दिवशी! तर विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; आंदोलकांचा संताप – “लोकशाही मार्गाने तिरडी आंदोलन”

प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी — पाचोऱ्यात समता सैनिक दलाचे उपोषण आंदोलन पाचव्या दिवशी!
विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; आंदोलकांचा संताप – “लोकशाही मार्गाने तिरडी आंदोलन”
पाचोरा (प्रतिनिधी) —
पाचोऱ्यातील समता सैनिक दलाचे बेमुदत उपोषण सोमवारी पाचव्या दिवशी पोहोचले असून, प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी उचलून आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
वाणेगाव येथील बौद्ध, चर्मकार आणि मातंग समाज बांधवांनी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र प्रशासनाने अद्यापही कोणतीही कारवाई न केल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या —
- स्मशानभूमीवरील अतिक्रमण तात्काळ हटविणे
- रमाई घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभ त्वरित वितरित करणे
- सुदामा रेसिडेन्सी (जारगाव) येथील अतिक्रमण तात्काळ हटविणे
- पाचोरा शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे
या मागण्यांवर प्रशासनाने अद्यापही ठोस भूमिका घेतली नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ समाजबांधवांवर आली आहे, असे आंदोलकांनी सांगितले.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणास समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव अभिमान बाविस्कर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, वडगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, भडगाव तालुका सचिव अजय संसारे, अनिल सोनवणे, सागर निकम, ईश्वर सोनवणे, तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.
“पाच दिवस उलटले, पण शासन वा प्रशासनाकडून ना ठोस आश्वासन, ना कार्यवाही,” अशी खंत उपोषणकर्ते किशोर डोंगरे यांनी व्यक्त केली.
आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू असून, प्रशासनाने लवकरात लवकर मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.



