पाचोरा येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन शेतकऱ्यांना मिळणार 8060 रुपये हमीभावाने कापूस खरेदी — आधार लिंक खात्यावर तात्काळ पेमेंट

पाचोरा येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन
शेतकऱ्यांना मिळणार 8060 रुपये हमीभावाने कापूस खरेदी — आधार लिंक खात्यावर तात्काळ पेमेंट
पाचोरा (प्रतिनिधी) —
कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा व सीसीआय (Cotton Corporation of India) दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील श्री गजानन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आज, मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा चे सभापती श्री गणेश भिमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिनिंगचे संचालक प्रमोद सोनार यांच्या हस्ते काटा पूजन पार पडले. पहिला कापूस विक्रीसाठी आणणारे शेतकरी गोविंद एकनाथ वाणी व गायत्री गोविंद वाणी यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या केंद्रावर प्रति क्विंटल 8060 रुपये हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली असून, नव्या हंगामात शेतकऱ्यांना थेट आधारकार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर तात्काळ पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे बँक पासबुक दाखविण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती सीसीआय अधिकाऱ्यांनी दिली.
श्री गजानन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीत नुकतेच जुन्या यंत्रसामग्रीऐवजी अत्याधुनिक व स्वयंचलित जिनिंग-प्रेसिंग युनिट बसविण्यात आले आहे. या सोहळ्याला सीसीआय केंद्र अधिकारी अनंत पुंडकर, श्री गजानन उद्योग समूहाचे संचालक राजाराम नागो सोनार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे, तसेच संचालक सुनील पाटील, प्रकाश तांबे, राहुल पाटील, युसुफ पटेल, निखिल पवार, व्ही. सी. पाटील, आर. एच. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सीसीआयच्या नवीन मोबाइल अॅप आधारित खरेदी प्रणालीबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून स्लॉट बुकिंग करावे लागणार आहे. मंजूर झालेल्या (Approved) शेतकऱ्यांनाच केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणण्याची परवानगी मिळणार आहे.
आधुनिक स्लॉट बुकिंग प्रणालीमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत अथवा जिनिंग फॅक्टरीत रांगेत दोन-दोन दिवस थांबण्याची वेळ येणार नाही. तसेच या वर्षी प्रति एकरी पाच क्विंटलपर्यंत कापूसच स्वीकारला जाणार असून, ८ ते १२ टक्के आर्द्रता, काडी-कचरा व कवडी विरहीत कापूस खरेदीस पात्र राहील.
या उद्घाटनानिमित्त पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केंद्रावर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सीसीआय खरेदी प्रक्रियेबाबत माहिती घेतली.



