शेतकरी अनुदान घोटाळ्याप्रकरणी आमदारांची चुप्पी संशयास्पद – माजी आमदार दिलीप वाघ यांचा आरोप

शेतकरी अनुदान घोटाळ्याप्रकरणी आमदारांची चुप्पी संशयास्पद – माजी आमदार दिलीप वाघ यांचा आरोप**
**पाचोरा | १० ऑक्टोबर | न्यूज झेप इंडिया वृत्तसेवा**
पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुदान घोटाळ्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात सत्ताधारी आमदार किशोर पाटील यांची चुप्पी संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार **दिलीप वाघ** यांनी केला आहे.
वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की,
“शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे पैसे दलाल व महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी लाटले. एवढ्या गंभीर प्रकरणात आमदार किशोर पाटील शांत का आहेत? या घोटाळ्यामागे स्थानिक सत्ताधाऱ्यांचे हात तर नाहीत ना?”
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष **मधुकर काटे**, नेत्या **वैशाली सूर्यवंशी**, माजी गटनेते **संजय वाघ**, **प्रदीप पाटील**, **शिवदास पाटील** यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
२ कोटींचा घोटाळा — पण आकडा १० कोटींपर्यंत?
वाघ यांनी पुढे सांगितले की, २०२३-२४ या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारकडून निधी मंजूर झाला होता. मात्र पाचोरा महसूल विभागातील **अव्वल कारकून अमोल भोई** याने दलालांच्या संगनमताने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणारी रक्कम बनावट खात्यांवर वर्ग केली.
या प्रकारात **सुमारे २ कोटी रुपयांचा** घोटाळा उघड झाला असला तरी, प्रत्यक्ष नुकसान **८ ते १० कोटी रुपयांपर्यंत** असल्याचा अंदाज वाघ यांनी व्यक्त केला.
**चौकशी S.I.T. किंवा उच्चस्तरीय यंत्रणेकडून करावी**
या घोटाळ्यात काही आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र चौकशी स्थानिक पातळीवर न ठेवता ती **S.I.D. अथवा अन्य स्वतंत्र चौकशी यंत्रणेकडून** व्हावी, अशी मागणी वाघ यांनी केली.
“ऐकला चलो रे” – वाघांचा नारा**
स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर असताना या घोटाळ्यामुळे राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पत्रकार परिषदेत शेवटी दिलीप वाघ यांनी “**ऐकला चलो रे**” असा नारा देत या विषयावर जनतेने जागरूक राहण्याचे आवाहन केले.



