पाचोरा तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

पाचोरा तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी
**पाचोरा (प्रतिनिधी):
अलीकडे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाचोरा तालुक्यातील अनेक गावांत जसे कि सातगाव , शिंदाड , वाणेगाव , लोहारी बु , आर्वे , वाडी शेवाळे , राजुरी , भोजे , चिंचपुरे , लासुरे ,निम्भोरी , सह इत्यादी गावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून गुरे-ढोरे वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून पाचोरा तालुक्यास ‘ओला दुष्काळग्रस्त’ घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे करण्यात आली आहे.
या संदर्भात मा. आमदार किशोर आप्पा पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तसेच तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
**शेतकऱ्यांचे पीक वाया, गुरेढोरे वाहून**
ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे पीक नष्ट झाले असून पशुधन वाहून जाऊन अनेकांचे जनावरांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी, अशी जोरदार मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील (मा.नगरसेवक), विधानसभाध्यक्ष नितीन तावडे, शहराध्यक्ष अजहर खान आणि युवक तालुकाध्यक्ष अभिजित पवार यांनी केली आहे.



