पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन, दीड कोटींहून अधिक रकमेची विक्रमी वसुली

पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन, दीड कोटींहून अधिक रकमेची विक्रमी वसुली
पाचोरा, १३ सप्टेंबर: येथील तालुका विधी सेवा समिती आणि पाचोरा तालुका विधिज्ञ बंधू भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने, पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात आज, शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात एकूण ४६० दिवाणी आणि वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असून, तब्बल १ कोटी ५९ लाख ६९ हजार ११५ रुपयांची विक्रमी रक्कम वसूल झाली आहे.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे आणि सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील प्रलंबित १५४ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. यातून १ कोटी ७ लाख ५० हजार ९४१ रुपयांची वसुली झाली. यासोबतच, न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची (वादपूर्व) ३०६ प्रकरणेही सामोपचाराने मिटवण्यात आली, ज्यातून ५२ लाख १८ हजार १७४ रुपयांची रक्कम वसूल करण्यात यश आले.
कौटुंबिक वादाची १२ प्रकरणे या लोक अदालतीत निकाली निघाली हे या दिवसाचे विशेष यश ठरले. यापैकी एका विभक्त झालेल्या कुटुंबात यशस्वी तडजोड घडवून आणण्यात आली आणि ते पुन्हा आनंदाने एकत्र नांदायला गेले. या यशस्वी सलोख्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या लोक अदालतीसाठी पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश एस. व्ही. निमसे यांनी काम पाहिले, तर पंच सदस्य म्हणून ॲड. भाग्यश्री महाजन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
हे राष्ट्रीय लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी पाचोरा न्यायालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, विविध बँका, बी.एस.एन.एल., वीज महावितरण कंपनी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले. दिवसभर चाललेल्या या लोक अदालतीत आपली प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी पक्षकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.



