मंगरूळ येथे पाच ट्रान्सफॉर्मर असूनही गाव अंधारात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण!

मंगरूळ येथे पाच ट्रान्सफॉर्मर असूनही गाव अंधारात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
पारोळा मंगरूळ, (प्रतिनिधी कैलास पाटील) :- मंगरूळ गावात पाच ट्रान्सफॉर्मर असूनही गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.
मागील एका महिन्यापासून तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरातील सरकारी दवाखान्याजवळील नाल्याशेजारी असलेला ट्रान्सफॉर्मर दोन ते तीन वेळा जळाला आहे. कधी केबल जळते, तर कधी संपूर्ण ट्रान्सफॉर्मरच निकामी होतो. विशेषतः पहाटे ४ ते ७ या वेळेत पाचही ट्रान्सफॉर्मरपैकी कोणत्या ना कोणत्या भागातील वीजपुरवठा खंडित असतोच. ‘आज एका भागातील वीज गेली तर उद्या दुसऱ्या भागातील,’ अशी नित्याचीच बाब झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. “गेल्या अनेक दिवसात सलग चार दिवस वीज मिळाली, असे आठवत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
एकीकडे वीज वितरण प्रशासन वीज बिल थकल्यास ग्राहकांकडे लगेच तगादा लावते, मात्र दुसरीकडे वेळेवर बिल भरूनही नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. त्यामुळे ‘वेळेवर बिल भरूनही सुविधा मिळत नसेल, तर दाद मागावी तरी कुणाकडे?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रशासनावर कोणताही धाक राहिलेला नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आता तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून मंगरूळ गावाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



