पिंपळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम: शालेय विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’ आणि कायद्याचे धडे

पिंपळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम: शालेय विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’ आणि कायद्याचे धडे
पिंपळगाव, दि. १४ (प्रतिनिधी): राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पिंपळगाव पोलिसांनी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींना कायद्याचे ज्ञान देत त्यांच्यात आत्मविश्वास आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ‘गुड टच, बॅड टच’ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
सध्याच्या काळात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेकदा भीतीमुळे किंवा अज्ञानामुळे मुली अत्याचाराला बळी पडतात. हीच बाब लक्षात घेऊन पिंपळगाव पोलिसांनी विद्यार्थिनींना थेट संवाद साधून मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस अधिकारी योगिता चौधरी, मनीषा खंडारे, आणि गायत्री पाटील यांनी विद्यार्थिनींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील नेमका फरक समजावून सांगितला.
यावेळी बोलताना महिला पोलिसांनी सांगितले की, “कोणीही अनोळखी किंवा परिचयाची व्यक्ती तुम्हाला स्पर्श करत असेल, तर तो स्पर्श कोणत्या भावनेने केला आहे, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. आई-वडिलांचा किंवा शिक्षकांचा कौतुकाचा स्पर्श हा ‘गुड टच’ असतो, परंतु कोणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल किंवा त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर तो ‘बॅड टच’ आहे. अशा वेळी न घाबरता त्वरित विरोध करा आणि आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना सांगा.”पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर यांनी पोक्सो कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुलींच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक कायदा असून, कोणताही त्रासदायक प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी. यासोबतच, “एकटे कुठेही फिरू नका, अनोळखी व्यक्तीने दिलेली कोणतीही वस्तू स्वीकारू नका किंवा त्यांच्या मोटरसायकलवर बसू नका. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री पालक किंवा भावाशिवाय घराबाहेर पडू नका,” अशा महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी दिल्या.
पोलिसांच्या या थेट संवादामुळे विद्यार्थिनींच्या मनातील भीती कमी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून आला. या अभिनव उपक्रमाचे शाळा प्रशासन आणि पालकांनी कौतुक केले असून, असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



