
जि.प. सदस्य पदम बापू पाटील ॲक्शन मोडमध्ये; शेतकरी कर्जमाफीच्या गावनिहाय याद्या जाहीर करण्याची मागणी
पाचोरा (प्रतिनिधी) – १३ मार्च २०२६ :
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या “महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी जि.प. सदस्य पदम बापू पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर मुद्दल व व्याजासह २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी** देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद शासनाने केली आहे.
शेतकऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये व पात्र लाभार्थ्यांना स्पष्ट माहिती मिळावी यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहीर करून त्या ग्रामपंचायत, चावडी, विकास सोसायटी कार्यालय तसेच संबंधित बँकांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पारदर्शकतेच्या दृष्टीने या याद्या अधिकृत शासकीय संकेतस्थळावरही प्रसिद्ध कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र शासन, युती शासन तसेच कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
निवेदन देताना जि.प. सदस्य पदम बापू पाटील (कुरंगी–बांबरुड गट) यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख विनोद भाऊ तावडे, विजय पोपट पाटील (चेअरमन, विकास सोसायटी वेरूळी), हेमराज ठाणसिंग पाटील (माजी सरपंच, मोहाडी), संतोष शिवाजी पाटील (शेतकरी), राजू नारायण चौधरी (शेतकरी) तसेच रोहित कैलास पाटील (माजी सरपंच आसनखेडा सुपुत्र) उपस्थित होते.



