पाचोरा पीपल्स बँक निवडणूक: निलेश मराठे यांच्या उमेदवारीवरून वाद पेटला

पाचोरा पीपल्स बँक निवडणूक: निलेश मराठे यांच्या उमेदवारीवरून वाद पेटला
पाचोरा, ५ जुलै: दि. पाचोरा पीपल्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडीच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. माघारीच्या अंतिम मुदतीनंतर, ‘सहकार पॅनल’चे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी, जनरल मतदारसंघातून निलेश विनायक मराठे यांनी माघार न घेतल्याने निवडणूक अटळ झाली आहे. यामुळे बँकेला लाखो रुपयांचा निवडणूक खर्च करावा लागणार असल्याचा आरोप सहकार पॅनलचे नेते ॲड. अतुल संघवी यांनी केला आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत जयकिरण प्रभाजी बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. अतुल संघवी यांनी, “निलेश मराठे हे त्यांच्या व्यक्तिगत आर्थिक फायद्यासाठी उमेदवारी करत आहेत. त्यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे बँकेला निवडणुकीसाठी लाखों रुपये खर्च करावे लागतील,” असे म्हटले.
‘माझी उमेदवारी बँकेच्या हितासाठी’ – निलेश मराठे यांचा प्रतिहल्ला
अतुल संघवी यांनी केलेल्या आरोपांना निलेश मराठे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “अतुल संघवी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत,” असे मराठे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी माझ्या आर्थिक फायद्यासाठी उमेदवारी करत नसून, माझी उमेदवारी कोणत्याही कर्जाची, व्याजाची रक्कम कमी किंवा माफ करण्यासाठी अजिबात नाही.”
मराठे यांनी बँक चेअरमन आणि संचालक मंडळाने बँकेचे किती हित केले आणि गरीब कर्जदारांना किती न्याय दिला, हे आपल्याला पाहायचे असल्याचे सांगितले. त्यांनी बँकेच्या मतदारांना आपल्या ‘छत्री’ या निवडणूक चिन्हावर शिक्का मारून आपल्याला विजयी करून संचालक म्हणून पाठवण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांचे काका सुरेश मराठे, वडील विनायक मराठे, आणि ॲड. शांतीलाल (बापू) सौंदाणे उपस्थित होते.
निवडणूक जाहीर झाल्यापासून बँकेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. ३० जून रोजी माघारीच्या दिवशी इतर गटातून अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने अतुल संघवींच्या सहकार पॅनलच्या ९ जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, निलेश मराठे यांच्या भूमिकेने आता जनरल मतदारसंघात निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.



