
पाचोरा बस स्थानकावर २६ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या !
पाचोरा, ४ जुलै: शहराच्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात काल (गुरुवारी) सायंकाळी एका २६ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छ. शिवाजी नगर, पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. एका मोटरसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी आकाशवर गावठी कट्ट्यातून १२ गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास आकाश मोरे बस स्थानकावर नातेवाईकांना सोडण्यासाठी गेला होता. तो आपल्या मोटरसायकलवर बसलेला असताना, एका मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसम त्याच्याजवळ आले आणि त्यांनी गावठी कट्ट्याने आकाशवर १२ गोळ्या झाडल्या. यात कपाळाच्या वर डोक्याजवळ १, डोक्यावर उजव्या बाजूला १, डोक्याच्या उजव्या बाजूला कानाच्या वरती १, डोक्याच्या मध्यभागी २, डोक्याच्या मागील बाजूस २ आणि पाठीवर ५ अशा एकूण १२ गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर आणि श्री. गणगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी आकाश मोरेला तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बस स्थानक परिसर तसेच ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मयत आकाश मोरेच्या कुटुंबात त्याचे वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहेत.
रात्री आठ वाजता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ पाचोऱ्याला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असून, त्यांना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



