पाचोरा PTC कडून ‘आकाशातील देवदूतांचा’ सत्कार: विमानात प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा गौरव

पाचोरा PTC कडून ‘आकाशातील देवदूतांचा’ सत्कार: विमानात प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा गौरव
पाचोरा: प्रवासात एका सहप्रवाशाचा जीव वाचवून ‘आकाशातील देवदूत’ म्हणून ओळख मिळवलेले डॉ. सागर गरुड यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ, सतीश उर्फ भोलाआप्पा चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड, दिशा डेंटल केअरचे डॉ. अमोल जाधव आणि माऊली हॉस्पिटलचे डॉ. अतुल महाजन हे तिघेही आपल्या कुटुंबासोबत सिक्कीम सहलीहून परतत होते. कोलकात्याहून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E334 विमानात अचानक एका 55 वर्षीय सहप्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या कठीण प्रसंगात, डॉ. गरुड यांनी जराही वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय मदत पुरवली आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. या वेळी डॉ. अमोल जाधव आणि डॉ. अतुल महाजन यांनीही डॉ. गरुड यांना मोलाची साथ दिली.
या हृदयस्पर्शी घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि सर्वसामान्यांमध्ये मोठा अभिमान निर्माण झाला आहे. उपस्थित मान्यवरांनी पाचोरा शहराला लाभलेले हे डॉक्टर खरेच समाजाचे आरोग्यदूत असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याची दखल घेत हा छोटेखानी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सत्कार सोहळ्याप्रसंगी नानासाहेब संजय वाघ यांनी डॉ. गरुड यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “केवळ वैद्यकीय ज्ञान असून चालत नाही, तर त्यासोबत धाडस, संवेदनशीलता आणि योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता लागते. डॉ. सागरदादा गरुड यांनी या तिन्ही गोष्टींचा मिलाफ दाखवून दिला आहे. त्यांच्या या कार्याचा आम्हा पाचोरेकरांना सार्थ अभिमान वाटतो.” ते पुढे म्हणाले, “हृदयविकारासारख्या जीवघेण्या अवस्थेत, विमानात उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांसह रुग्णाला वाचवणे ही केवळ व्यावसायिक पदवी नाही, तर ती मानवतेची मोठी शिकवण आहे. डॉ. गरुड आणि त्यांचे सहकारी खरेच आकाशातील देवदूत ठरले आहेत.”
या प्रसंगी सतीश उर्फ भोलाआप्पा चौधरी यांनी डॉक्टरांच्या या अतुलनीय कार्याचे गौरव करताना सांगितले, “आपल्या मतदारसंघात असे डॉक्टर कार्यरत असावेत हे आमच्यासाठी खरोखरच भाग्याचे आहे. समाजहितासाठी त्यांनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे.”
या सत्कार समारंभात डॉ. सागर गरुड यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या सन्मान सोहळ्यामुळे डॉक्टरांच्या कार्याबद्दल जनतेमध्ये अधिक सन्मान आणि विश्वास वाढला असून, आपत्कालीन परिस्थितीतही डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी पाचोरा शहराच्या वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. डॉ. सागर गरुड, डॉ. अमोल जाधव आणि डॉ. अतुल महाजन यांच्या कार्यामुळे ‘हेल्थ केअर’ या संकल्पनेला एक नवीन सामाजिक आयाम मिळाला असून, या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण डॉक्टर वैद्यकीय सेवेकडे सामाजिक दायित्व म्हणून पाहू लागले आहेत.
पाचोरा येथील हे वैद्यकीय तिकुट आज केवळ शहरापुरते मर्यादित राहिले नसून, आकाशातही त्यांनी आपली जबाबदारी आणि कौशल्य सिद्ध करून दाखवले आहे. ‘आकाशातील देवदूत’ हे बिरुद खरोखरच या डॉक्टरांच्या नावास योग्यच आहे.



