पाचोरा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ! एकाच नावाने दोन शाळा, बोगसगिरीचा संशय !

पाचोरा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ! एकाच नावाने दोन शाळा, बोगसगिरीचा संशय?
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. लोहारी बुद्रुक येथे एकाच नावाने दोन माध्यमिक विद्यालये कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी एका सुज्ञ नागरिकाने थेट शिक्षण विभाग मंत्रालयाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे, ज्यामुळे शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहारी बुद्रुक येथे ‘दत्त माध्यमिक विद्यालय’ या नावाने दोन संस्था कार्यरत आहेत. पहिली संस्था ‘नवल भाऊ प्रतिष्ठान धुळे’ यांच्याद्वारे सन १९९२ मध्ये स्थापित करण्यात आली असून ती सुरळीतपणे सुरू आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ही शाळा ९ सप्टेंबर २०१९ रोजी ‘बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन’ यांना हस्तांतरित करण्यात आली. मात्र, याच संस्थेच्या चालकांनी शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून अथवा आर्थिक व्यवहार करून दोन वर्षे मागे जात, २० फेब्रुवारी २०१७ रोजी याच नावाने नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
एकाच गावात, एकाच नावाच्या दोन शाळा कशा असू शकतात, असा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला आहे. तसेच, एकाच शाळेत स्वयंअर्थसहाय्यित आणि १००% अनुदानित असे दोन विभाग एकाच U-DISE क्रमांकावर कसे चालवले जाऊ शकतात, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.
या गंभीर तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रमोद कदम यांनी ७ एप्रिल २०२५ रोजी नाशिक विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, एकाच नावाने दोन शिक्षण संस्था असू शकत नाहीत. त्यामुळे दोन्ही शिक्षण संस्थांची कसून चौकशी करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या घडामोडींमुळे बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या दत्त माध्यमिक विद्यालयाच्या कारभाराबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता अधिकृतपणे वाचा फुटली आहे. शिक्षण विभागाच्या चौकशीनंतर या कथित बोगसगिरी आणि गैरव्यवहाराचे सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्याने सुरु होणा-या इतर संस्थांनाही एक कडक संदेश मिळण्याची शक्यता आहे.



