गुन्हेगार कितीही दूर असला तरी कायद्याचा हात लांबच; पाचोरा पोलिसांनी फरार आरोपीला केले जेरबंद

पाचोरा पोलिसांची दमदार कामगिरी; राजस्थानमधील दोन वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
पाचोरा, दि. ७ जून — पाचोरा पोलिसांनी उत्कृष्ट सतर्कता व कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर राजस्थान राज्यातील गंभीर गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईमुळे पाचोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
राजस्थान राज्यातील अजमेर जिल्ह्यातील सराणा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या अफू मादक पदार्थ प्रकरणी दाखल गुन्हा क्रमांक 11/2024 मधील फरार आरोपी गोविंद शंभूनाथ (वय २७, रा. बनका खेडा, ता. कोठली, जि. भिलवाडा, राजस्थान) हा पाचोरा शहरात असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना प्राप्त झाली होती.
माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सफौ विलास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील व गणेश कुंवर यांनी आरोपीचा शिताफीने शोध घेतला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदर आरोपीविरुद्ध राजस्थानमधील अजमेर तसेच चित्तौडगड परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पाचोरा पोलिसांच्या या धाडसी आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे परराज्यातील गंभीर गुन्हेगाराला पकडण्यात यश आले असून राजस्थान पोलीस दलासह पाचोरा परिसरातील नागरिकांनीही पोलिसांचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे बाहेरील राज्यातील गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश बसण्यास मदत होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
“गुन्हेगार कितीही दूर पळाला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही,” हे पाचोरा पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे.



