जामनेर, शेंदुर्णी येथील घटना आणि प्रलंबित मागण्यांसाठी पाचोऱ्यात समता सैनिक दलाचा मोर्चा !

जामनेर, शेंदुर्णी येथील घटना आणि प्रलंबित मागण्यांसाठी पाचोऱ्यात समता सैनिक दलाचा मोर्चा
पाचोरा: जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि शेंदुर्णी येथील निषेधार्थ घटना तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील समाज बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी समता सैनिक दलाच्या वतीने सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी पाचोऱ्यात निषेध व धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे. भ्रष्ट आणि सुस्त प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा मोर्चा जारगाव चौफुली येथून सकाळी ११ वाजता सुरू होऊन प्रांताधिकारी कार्यालय, पाचोरा येथे पोहोचेल. लोकशाही मार्गाने आणि शांततेत काढण्यात येणाऱ्या या मोर्चातून विविध मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या जाणार आहेत.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना: शेंदुर्णी, ता. जामनेर येथे स्वातंत्र्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
- ‘संविधान का बदलावे?’ पुस्तकावर बंदी: ‘संविधान का बदलावे?’ या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक अॅड. शिवाजी कोकणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी.
- स्मशानभूमीवरील अतिक्रमण: वाणेगाव, ता. पाचोरा येथील बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण तत्काळ हटवून ती जागा तार कंपाऊंडसह समाज बांधवांच्या ताब्यात द्यावी.
- सामाजिक बैठकीसाठी जागा: गिरड, ता. भडगाव येथील समाज बांधवांसाठी सामाजिक बैठक व प्रबोधनासाठी जागा त्वरित मंजूर करून ती त्यांच्या ताब्यात द्यावी.
- शासकीय योजनांचा लाभ: भिल्ल, नवबौद्ध, रमाई घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा.
- ईश्वर सोनवणे यांना जमिनीचा हक्क: अंजनविहिरे, ता. भडगाव येथील शेतकरी ईश्वर माणिक सोनवणे यांच्या मालकीची मौजे गिरड शिवारातील गट क्र. २३२ मधील १ हेक्टर ४२ आर जमीन त्यांच्या नावावर त्वरित लावावी.
- दीपक बाविस्कर यांना जमिनीचा हक्क: अंजनविहिरे, ता. भडगाव येथील दीपक जयराम बाविस्कर यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीमधील त्यांच्या हिश्शाची जमीन त्यांच्या नावावर लावण्यात यावी.
- शेतकरी अनुदान घोटाळ्याची चौकशी: पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील १ कोटी २२ लाख रुपयांच्या शेतकरी अनुदान घोटाळ्याची उच्च स्तरीय आर्थिक गुन्हे शाखा (EOW) मार्फत सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा.
- सुलेमान शेख हत्या प्रकरणाची चौकशी: जामनेर येथील सुलेमान शेख या युवकाच्या हत्येची उच्च स्तरीय चौकशी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी.
- अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची चौकशी: पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा.
या मोर्चात समता सैनिक दलाचे पदाधिकारी, हितचिंतक आणि संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



