ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला मारहाण; कारवाईअभावी उपोषणाची वेळ

ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला मारहाण; कारवाईअभावी उपोषणाची वेळ
पाचोरा – २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला. मात्र, त्यांच्याच जयंतीदिनी भरलेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर हिंसक पद्धतीने हल्ला झाल्याने लोकशाही प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामसभा ही नागरिकांना आपल्या गावातील प्रश्न, समस्या आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न विचारण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे ग्रामसभेत लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे चुकीचे आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न केवळ मारहाण झालेल्या एका तरुणाचा नसून ग्रामसभेत आपल्या हक्काने प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक तरुणाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेला ६ ऑक्टोबर उजाडूनही संबंधित व्यक्तीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर अद्याप साधा गुन्हाही दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित तरुणावर न्यायाच्या मागणीसाठी उपोषणाला बसण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले.
या उपोषणाला छात्र भारती संघटनेने समर्थन जाहीर केले आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी तसेच ग्रामसभेत घडलेल्या हिंसाचाराचा जाहीर निषेध करावा, अशी मागणी छात्र भारतीच्या वतीने करण्यात आली आहे.
ग्रामसभा ही प्रश्न विचारण्याची आणि लोकशाही पद्धतीने उत्तर मागण्याची जागा आहे. प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाला हिंसेला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.



