हिवरा नदीत १६ वर्षीय निकिता वाहून गेली; नातीच्या धक्क्याने आजोबांचा मृत्यू !

हिवरा नदीत १६ वर्षीय निकिता वाहून गेली; नातीच्या धक्क्याने आजोबांचा मृत्यू
*पाचोरा (प्रतिनिधी)* :
पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे आज रोजी हृदय पिळवटून टाकणारी शोकांतिका घडली. हिवरा नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली. *१६ वर्षीय निकिता* नदीकाठावर पाय घसरून पाण्यात पडली आणि प्रचंड प्रवाहात वाहून गेली.
भाचीला वाचविण्यासाठी मामीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र तिला पोहता न आल्याने तीही वाहू लागली. हे दृश्य पाहताच गावकऱ्यांनी आरडाओरड करत धाव घेतली व जीवाच्या आकांताने प्रयत्न करून मामीला वाचविले. पण दुर्दैवाने निकिताचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
घटनेनंतर संपूर्ण गावातील तरुण, विशेषतः भिल्ल समाजातील ४०-५० युवक, संध्याकाळपर्यंत नदीत उतरून शोध घेत होते. तरीसुद्धा नदीच्या पाण्यात लुप्त झालेल्या मुलीचा शोध लागला नाही.
दरम्यान, ही बातमी घरी पोहोचताच *७२ वर्षीय आजोबा शामराव विठ्ठल खरे* यांनी नातीच्या दुर्घटनेचा धक्का सहन न करता जागीच प्राण सोडले. एका घरातील दोन जीव एका दिवसात हिरावून नेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य *पद्मसिंग पाटील* आणि आमदार *किशोर पाटील* यांनी तातडीने विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करण्यात आले.
या दुर्दैवी प्रसंगाने वडगाव टेक परिसरात शोककळा पसरली आहे. निकिताच्या शोधासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.



