मणियार विधी महाविद्यालय येथे पीएम-उषा एकदिसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

मणियार विधी महाविद्यालय येथे पीएम-उषा एकदिसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*
26 सप्टेंबर: खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या एस. एस. मणियार विधी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “मुला-मुलीं चे समुपदेशन” पीएम – उषा सॉफ्ट घटक एकदिवसीय कार्यशाळा मणियार विधी महाविद्यालय येथे पार पडली.
सकाळी साडे नऊ वाजता दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. के.सी.ई. संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या अध्यक्षतेखाली व जळगावचे सह दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग श्री. एम. व्ही. चव्हाण, आय.एम.आर कॉलेजचे डॉ. पराग नारखेडे, मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी आणि कार्यक्रम संयोजक प्रा. जी. व्ही. धुमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी न्या. चव्हाण यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्नशील राहिल्यास यश मिळते असे सांगून समुपदेशनासारख्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. राणे यांनी अध्यक्षीय समारोपात विद्येबरोबर विनयशीलता तरुणांनी अंगिकारली पाहिजे हे स्पष्ट केले व कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले आणि उपस्थितांचा सत्कार केला.
त्यानंतर नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. साहेबराव पडलवार यांच्या करिअर विषयक मार्गदर्शनाने प्रथम सत्रास सुरुवात झाली. योग्य करिअरची निवड, ते मिळविण्यासाठी व मिळवल्यानंतर ते टिकविण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये सांगत विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.



