पाचोरा तालुक्यातील पूरस्थिती : पंचनामे युद्धपातळीवर

पाचोरा तालुक्यातील पूरस्थिती : पंचनामे युद्धपातळीवर
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. घरांचे, जनावरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे युद्धपातळीवर सुरू केले आहेत.
वाणेगाव दृष्य :-
शिंदाड, राजुरी, निंभोरी, वानेगाव, वाडी-शेवाळे, वेरूळी, पिंपळगाव (हरेश्वर) आदी गावांमध्ये नदी-नाल्यांना मोठा पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंगरमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पाण्याने गावांमध्ये शिरकाव करत मोठे नुकसान घडवले आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत शिंदाड व पिंपळगाव (हरेश्वर) महसूल मंडळातील 11 गावांमधील 648 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर शेतीचे पंचनामे सुरू असून अतिरिक्त 20 कर्मचाऱ्यांची टीम कामाला लागली आहे.
“नुकसान जास्त असल्याने पंचनामे करण्यास वेळ लागत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आज आणि उद्या सर्व पंचनामे पूर्ण होतील. शेतकरी बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.



