
जामनेर लाच प्रकरण: एसीबीने दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले
जामनेर तालुक्यातील पंचायत समितीतील दोन अधिकाऱ्यांना आज पाडव्याची सुटी असतांना देखील लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या दोघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रवींद्र शालीग्राम सपकाळे (वय 54, सहायक गटविकास अधिकारी) व पद्माकर बुधा अहिरे (वय 53, विस्तार अधिकारी) असे दोघा अधिकाऱ्यांचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीत अनुकूल असा रिपोर्ट देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार आज पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे (वय 54) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (वय 53) या पंचायत समितीतील दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला बोलावले होते. येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या कारवाईमुळे लाचलुचपतीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.



