अंबे वडगावातील वैष्णवी चोपडा (जैन) यांचे जैन पर्युषण पर्वात उपवास !

अंबे वडगावातील वैष्णवी चोपडा (जैन) यांचे जैन पर्युषण पर्वात उपवास !
पाचोरा: भारतीय संस्कृतीत त्याग आणि संयमाचे प्रतीक असलेले ‘पर्युषण पर्व’ नुकतेच सुरू झाले आहे. या पर्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व असून, जैन धर्मात या काळात उपवास, त्याग आणि आत्मशुद्धीला महत्त्व दिले जाते.
याच पर्वाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील रहिवासी दिलीप चोपडा (जैन) यांची कन्या कु. वैष्णवी चोपडा (जैन) हिने मोठा संकल्प केला आहे. तिने २० ऑगस्ट, २०२५, बुधवारपासून अन्नत्याग करून उपवासाला सुरुवात केली आहे.
पर्युषण पर्व हे केवळ उपवासाचे नसून, ते मानवी मनातील वैचारिक आणि भावनिक नाती जपण्याचे एक माध्यम आहे. या काळात जैन धर्मातील ‘दशलक्षणादी धर्म’ म्हणजेच दहा महत्त्वाच्या गुणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. हे गुण माणसाला प्रेम, आपुलकी आणि करुणा या मूल्यांची आठवण करून देतात.
कु. वैष्णवी चोपडा हिच्या या उपोषणाचे खूप कौतुक होत आहे. तिचा हा उपवास २७ ऑगस्ट, २०२५, बुधवार रोजी पाचोरा येथील जैन स्थानकांमध्ये पूर्ण होणार आहे. तिचे हे कार्य जैन धर्मातील त्याग, वैराग्य आणि संयम या मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.



