ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक बळी; पाचोरा येथील महिलेकडून ३ लाखांची लूट

ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक बळी; पाचोरा येथील महिलेकडून ३ लाखांची लूट
**पाचोरा (प्रतिनिधी) | दि. ९ ऑक्टोबर २०२५**
पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरात राहणाऱ्या **वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी (वय ३८)** या महिलेला ऑनलाईन फसवणुकीचा बळी पडावे लागले आहे. काही अनोळखी व्यक्तींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने विश्वास संपादन करून तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात **गु.र.नं. ४७४/२०२५ भा.दं.वि. कलम ३०८(१), ३०८(२)** अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी स्वतःला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोग, आयकर विभाग, सीबीआय, आणि ईडी विभागाशी संबंधित अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यांनी विविध बहाण्यांनी ऑनलाईन व्यवहार करायला लावून सुमारे ३ लाख रुपयांची रक्कम हातोहात लाटली.
फिर्यादींना आरोपींनी मोबाईल कॉल्स व सोशल मीडियाच्या संदेशांद्वारे संपर्क साधून फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. नंतर संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
या घटनेचा तपास **पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार** यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
“कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ऑनलाईन लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. शंका आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा.”



