पाचो-यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; पी.आय. अशोक पवारांच्या नेतृत्वाखाली मोहीम

पाचो-यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; पी.आय. अशोक पवारांच्या नेतृत्वाखाली मोहीम !
पाचोरा, (१५/०६/२०२२५): पाचोरा शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि नियमांच्या उल्लंघनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशेष मोहीम राबवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली.


मागील काळात दोन वाहतूक पोलीस निलंबित झाल्याने पाचोऱ्यात वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर झाली होती. या पार्श्वभूमीवर, वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांना कायद्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याचे दिसून येते. अनेक वाहनचालक टू-व्हीलर, फोर-व्हीलर आणि व्यावसायिक वाहनांवर नियमांचे उल्लंघन करताना आढळतात. यात चुकीच्या नंबर प्लेट लावणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, वाहनांचे नियमबाह्य मॉडिफिकेशन करणे, आणि टू-व्हीलरवरही ओव्हरलोड माल वाहून नेणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे, ज्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी स्वतः उपस्थित राहून या कारवाईचे नेतृत्व केले. यावेळी अनेक बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी नागरिकांना भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या वाहनांची नियमित तपासणी करणे, पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवणे, तसेच नियमबाह्य हॉर्न किंवा बॉडी मॉडिफिकेशन टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा, कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या मोहिमेत पोलीस कर्मचारी रणजीत पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, गजानन जोशी आणि दलातील अन्य सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनीही या कारवाईत पोलिसांना सहकार्य केल्याचे दिसून आले.
पुढील काळात नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि वाहनांना कर्णकर्कश हॉर्न लावणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आता ऑनलाइन पद्धतीने चलन जारी केले जाईल आणि त्यासाठी वाहनधारकाला कोर्टात, आरटीओ कार्यालयात किंवा पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहून दंड भरावा लागेल, असेही पोलिसांनी नमूद केले. नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



