पाचोरा पोलिसांच्या कारवाईत ‘गुटखा किंग’चा पर्दाफाश होण्याची शक्यता; चालकाला २ दिवसांची पोलीस कोठडी

पाचोरा पोलिसांच्या कारवाईत ‘गुटखा किंग’चा पर्दाफाश होण्याची शक्यता; चालकाला २ दिवसांची पोलीस कोठडी
पाचोरा, [१५/०६/२०२५]: पाचोरा पोलिसांनी १३ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भडगाव रोडवरील एम. एम. कॉलेजसमोर नाकाबंदी करत अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (एम.एच. ०३, सी.पी. २४९७) या वाहनातून १५ पोती प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून, वाहनचालक अशोक रमेश भिल (वय २५, रा. हेकंवाडी, जि. धुळे) याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी चालकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने आता ‘गुटखा किंग’पर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान संशयित वाहनाला अडवून तपासणी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोत्यांची तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहनचालक अशोक भिल याला अटक करून वाहन आणि गुटखा पाचोरा पोलीस ठाण्यात आणला. त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल, १४ जून रोजी संशयित आरोपीला पाचोरा न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासकामी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी गुटख्यावर अनेकदा कारवाई झाली असली तरी, आरोपींना पोलीस कोठडी मिळत नसल्याने मुख्य सूत्रधार कधीच समोर येत नव्हते. मात्र, आता पोलीस कोठडी मिळाल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची पोलिसांना संधी मिळाली आहे.
या कारवाईत पाचोरा पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कसून चौकशी केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. हा गुटखा कुठून आणण्यात आला, कोणाच्या सांगण्यावरून आणला होता, कुठे आणि कोणाकडे पाठवला जाणार होता, तसेच गाडीचा मूळ मालक कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलिसांनी गुटख्याने भरलेले वाहन ताब्यात घेतल्यानंतर एम. एम. कॉलेज चौकात काही व्यक्तींनी पोलिसांची मनधरणी करून गाडी सोडवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या व्यक्तींचा या गुटखा वाहतुकीशी काय संबंध होता, याचाही तपास पोलिसांनी करणे आवश्यक आहे.
धुळे जिल्ह्यातील संशयित आरोपी वाहनचालक पोलीस कोठडीत असताना, पाचोरा तालुक्यातील तारखेडा आणि पाचोरा शहरातील काही व्यक्तींनी आरोपीला भेटून त्याची बडदास्त ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. आरोपीने कुणाचीही नावे सांगू नयेत यासाठी हा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी वाहनचालकाची बडदास्त ठेवण्यामागचा खरा हेतू तपासल्यास किंवा ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे भ्रमणध्वनी तपशील (सी.डी.आर.) तपासल्यास अनेक मोठे ‘मासे’ गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या चौकशीतून पाचोरा, तारखेडा, पिंपळगाव हरेश्वर, शेंदुर्णी, लोहारा, तसेच मराठवाड्यातील सोयगाव आणि बनोटीपर्यंतचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. जर पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कसर न सोडता कसून तपास केला, तर पाचोरा तालुक्यात कायमस्वरूपी गुटखाबंदी होऊन व्यसनाधीनता कमी होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



