राजपूत समाजाच्या राज्य नेतृत्वासाठी आमदार किशोर पाटील यांना पुढे करण्याची मागणी; मंत्रिपदासाठीही शिंदेंकडे साकडे

राजपूत समाजाच्या राज्य नेतृत्वासाठी आमदार किशोर पाटील यांना पुढे करण्याची मागणी; मंत्रिपदासाठीही शिंदेंकडे साकडे
नाशिक | प्रतिनिधी
राज्यातील राजपूत समाजाचे नेतृत्व पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांनी करावे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी द्यावी, अशी ठाम मागणी सकल राजपूत समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आली.
नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस-इन येथे ५ जुलै रोजी आयोजित बैठकीत राज्यभरातील राजपूत समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते.
बैठकीस राजपूत भामटा समितीचे अध्यक्ष प्रा. सजनसिंग पवार, प्राचार्य भगवानसिंग ढांचाल, प्रा. डॉ. जसपालसिंह सिसोदिया, अॅड. आनंदसिंग वायस, मधु पाटील, अॅड. धनंजय ठोके, ओम राजपूत यांच्यासह विविध जिल्ह्यांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रसिंग चौहान, धुळे जिल्हा राजपूत समाजाचे अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, जिल्हा परिषद सदस्य विरेन्द्रसिंग गिरासे, रत्नदीप सिसोदिया, गिरीश परदेशी, बबलू परदेशी, सीए जयप्रकाशसिंग गिरासे, मिलिंद राजपूत, डॉ. जीवन राजपूत आदींची उपस्थिती होती.
समाजाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा
बैठकीत राजपूत भामटा व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, समाजाचे राज्यव्यापी संघटन, विद्यार्थिनींसाठी वसतिगृहांची उभारणी, सामाजिक प्रश्न आणि समाजाच्या भविष्यातील दिशेबाबत सखोल चर्चा झाली.
प्रा. सजनसिंग पवार यांनी प्रस्तावनेत समाजाच्या संघटनात्मक बांधणीची आवश्यकता अधोरेखित केली. प्राचार्य भगवानसिंग ढांचाल यांनी आगामी काळात राज्यभर राजपूत समाजाचे महामेळावे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला.
प्रा. डॉ. जसपालसिंह सिसोदिया यांनी “एक राज्य – एक नेता” या संकल्पनेचा पुरस्कार करत आमदार किशोर पाटील यांनी राज्य नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
अॅड. आनंदसिंग वायस यांनी राजपूत भामटा प्रकरणातील न्यायालयीन व तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मंत्रिपदासाठीही व्यक्त झाली भावना
बैठकीतील बहुतांश वक्त्यांनी राजपूत समाजाच्या विविध संघटनांना एकत्र आणून “सकल राजपूत समाज” या एकाच व्यासपीठाखाली मजबूत संघटन उभारण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी राज्य नेतृत्व स्वीकारावे, असा एकमुखी आग्रह धरण्यात आला.
याचबरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी द्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सहा महिन्यांत नाशिकमध्ये महामेळाव्याची घोषणा
अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांनी व्यक्त केलेल्या भावना मान्य करत समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले. तसेच आगामी सहा महिन्यांत नाशिक येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावेळी छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर भव्य राज्यस्तरीय राजपूत समाज महामेळावा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक नरेंद्र सौकुदे यांनी केले, तर आभार प्रदर्शनानंतर बैठकीची सांगता झाली.



