लोकमाता अहिल्यादेवी होळकर “जीवन गौरव पुरस्काराने” पत्रकार प्रमोद बारी यांचा सन्मान!

पत्रकार प्रमोद बारी यांना ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार – २०२६’ प्रदान
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, जनलक्ष्य न्यूजचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार – २०२६” या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड व लोकाभिमुख कामगिरी, सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने केलेले कार्य आणि समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत प्रमोद बारी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमोद बारी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले.



