आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविणार — महेंद्र भावसार!

जळगाव – (प्रतिनिधी) :- आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ नाशिक च्या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती ऍड. महेंद्र भावसार यांनी आज दिनांक १६ रोजी पत्रकार परिषदेत दिली.पुढे बोलतांना ते म्हणाले की,गेली 35 वर्षापासून मी धुळे, जळगाव, नंदुरबार, आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात शैक्षणिक क्षेत्र आणि धर्मदाय आयुक्त एवढ्या मर्यादित विषयावर विधिज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो. आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ नाशिक च्या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे.
तसेच शिक्षक न्याय व हक्क परिषद या संघटनेमार्फत अनेक शिक्षकांच्या समस्या मी आतापर्यंत न्यायालयामार्फत तसेच आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी सोडविलेल्या आहेत. शिक्षकांसाठी असलेली जुनी पेन्शन योजना ही पूर्ववत त्यांना लागू करावी हा शिक्षकांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात सुमारे 8000 शिक्षकांना शासनाने अपात्र घोषित केले होते आणि परीक्षेत गैरप्रकार केला म्हणून या आठ हजार शिक्षकांकडे समाज देखील एका अपराधी भावनेने पाहत होता, अशा वेळेस या सर्व भेदरलेल्या शिक्षकांची एक व्यापक स्तरावर राज्य स्तरीय बैठक धुळे येथे घेतली आणि त्यांना दिलासा दिला. शिक्षकांवरील कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता अपात्र घोषित केलेले आहे. त्यामुळे आपण न्यायालयात लढा द्यावा, त्यानुसार आम्ही नामदार उच्च न्यायालयात या शिक्षकांच्या वतीने पिटीशन दाखल केले आणि त्वरित त्यांना स्टे मिळाला. ते शिक्षक आजही कामावर हजर आहेत.
याशिवाय नुकताच काल झालेला शिक्षकांवरील अन्याय मला निदर्शनास आला. जळगाव जिल्ह्यातीलच जे शिक्षक बी.एल.ओ. म्हणून निवडणुकीसाठी कामकाज करतात त्या शिक्षकांना एखाद्या वेठबिगाराची पात्रता समजून त्यांच्याशी शासन वागणूक करते. बी.एल.ओ. शिक्षकांना वर्षभर सगळे निवडणुकीचे काम करून देखील 150 रुपये मानधन दिले जाते. ही शिक्षकांची थट्टा आहे आणि अनेक बी.एल.ओ. शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी (कर्तव्य) करताना जेवण, चहा, नाश्ता काही मिळालेले नाही. त्यांनी स्वखर्चाने किंवा उपाशीपोटी हे कामकाज केले. एवढेच नव्हे तर त्यांना शासनाने दोन स्वयंसेवक नियुक्त करण्यास सांगितले या स्वयंसेवकांचे मानधन देखील दिले नाही. त्या 150 रुपयाच्या मानधनातून या स्वयंसेवकांना देखील मानधन द्यावे लागले. प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्यात केवळ सुट्टीच्या दिवशी शिक्षकांना अशा प्रकारचे कामे द्यावीत. अध्यापनाचे वेळेत किंवा वर्किंग अवर्समध्ये अशी कामे देऊ नयेत असे निर्देश असताना देखील या बी.एल.ओ. यांना सरसकट या कामात जुंपले गेले. त्यांचा देखील प्रश्न मी आता हाती घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कंटेम्ए ऑफ कोर्ट च्या नोटिसा आम्ही देणार आहोत. शिक्षकांवर असलेला अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करणे, असे अनेक प्रश्न शिक्षकांसमोर आहेत.



