पाचोरा कृष्णापुरीतील गुरुदत्त नगरातील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश
पाचोरा कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश !
पाचोरा, कृष्णापुरी – गेल्या काही दिवसांपासून कृष्णापुरी भागात धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी माकडाला अखेर वनविभागाने पकडले आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वनविभागाच्या पथकाला हे यश मिळाले.
गेल्या अनेक दिवसांपासून हे माकड परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले होते. घरांमध्ये घुसून वस्तूंची नासधूस करणे, छतांवरून उड्या मारणे आणि अंगणातील सामानाचे नुकसान करणे असे प्रकार वाढले होते. माकडाला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक प्रयत्न करत होते, पण ते वारंवार हुलकावणी देत होते.
अखेर आज सकाळी, गुरुदत्त नगर हटकेश्वर महादेव मंदिर परिसरातील स्थानिक रहिवाशांनी या माकडाला एका ठिकाणी घेरले आणि तात्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या शांत आणि संयमी मदतीमुळे माकडाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर माकडाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल रहिवाशांनी वनविभाग आणि मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले. यामध्ये वनमजूर श्रावण पाटील, वाहन चालक सचिन कुमावत, डाटा ऑपरेटर हितेश पाटील, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी, तसेच बापू महाजन, न्यूज झेप इंडियाचे पत्रकार डॉ. योगेश पाटील, गजानन पाटील, भूषण पाटील, ईश्वर पाटील आणि जिभाऊ पाटील यांचा समावेश आहे. या घटनेमुळे कृष्णापुरी , गुरुदत्त नगर , हटकेश्वर महादेव मंदिर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.



